लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… पहाटेच्या वातावरणात घुमणारे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि ‘मोरया मोरया’च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात पारंपरिक पेहरावातील हजारो महिलांनी केलेल्या गणेशाच्या आराधनेने ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या उत्सव मंडप परिसराने मंगलमय अनुभूती घेतली.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीसमोर ऋषिपंचमी निमित्त पहाटे महिलांनी अथर्वशीर्ष पठण करून आदिशक्तीच्या सामर्थ्याची प्रचिती दिली. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, अमर कोद्रे, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव या वेळी उपस्थित होत्या. रशिया आणि थायलंड येथून आलेल्या परदेशी पाहुण्यांनी सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा ३६ वे वर्ष होते.

आणखी वाचा-श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : श्रीराम मंदिर देखाव्याचे गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते उद्घाटन

महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गजाननाला अभिवादन केले. मोबाईलचा प्रकाश उंचावून महिलांनी गणरायाचा जयघोष केला.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता. गणेशोत्सवाचा गौरव वाढविणारा हा कार्यक्रम असल्याची भावना उपस्थितांनी या वेळी व्यक्त केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mass recitation of atharvashirsha by thousands of women in front of shrimant dagdusheth halwai ganpati pune print vvk 10 mrj