पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात निगडी ते चाकण दरम्यान दुसरा मेट्रो मार्ग साकारला जाणार आहे. ३१ स्थानके असलेल्या या ४०.९२६ किलोमीटर अंतराच्या मार्गासाठी दहा हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या मार्गामुळे पिंपरी-चिंचवड, चाकण एमआयडीसीचा भाग मेट्रोने जोडला जाणार आहे. या प्रस्तावित मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिकेला सादर केला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत दापोडी ते पिंपरी अशी मेट्रो धावत आहे. या मार्गाचे निगडीतील भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंत ४.५१९ अंतर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. दापोडी ते निगडी या एकमेव मेट्रो मार्गानंतर आता निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक ते चाकण असा दुसऱ्या मार्गाचा आराखडा तयार झाला आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (महामेट्रो) आराखडा महापालिकेकडे सादर केला आहे. सध्या असलेल्या मेट्रोमार्गिकेप्रमाणेच हा मार्गही उन्नत असणार आहे. या एकूण १० हजार ३८३ कोटी ८९ लाख खर्चाच्या आराखड्यामध्ये ३१ मेट्रो स्थानके असणार आहेत. त्यांपैकी २५ पिंपरी-चिंचवड हद्दीत असतील.
या नव्या मार्ग, स्थानकांसाठी महापालिका ३३ कोटी रुपये किमतीची १५ हजार ९०९.६५ चौरस मीटर जागा देणार आहे. राज्य शासनाची एक लाख ३४ हजार ८४१.८३ चौरस मीटर जागा आहे. त्या जागेचे मूल्य ७७ कोटी आठ लाख आहे. तर, ७२ कोटी २८ लाख रुपये मूल्याची १८ हजार ४७४.१८ चौरस मीटर क्षेत्रफळाची खासगी जागा घेण्यात येणार आहे. महापालिका सभेने मान्यता दिल्यानंतर आराखडा राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. राज्य शासनाकडून तो केंद्र शासनाकडे पाठविला जाईल. केंद्राकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष मार्गाचे काम सुरू होईल. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवडचा ७५ टक्के भाग मेट्रोने जोडला जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
कसा असेल मार्ग?
निगडीतील भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, ट्रान्सपोर्टनगर, गणेशनगर, मुकाई चौक, रावेत, पुनावळे गाव, पुनावळे, ताथवडे गाव, ताथवडे, भुमकर चौक, भुजबळ चौक, वाकड, विशालनगर कॉर्नर, कोकणे चौक, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वल्लभनगर (वायसीएमजवळ), गवळीमाथा चौक, भोसरी एमआयडीसी, वखार महामंडळ गोदाम चौक, पीआयईसी, मोशीतील भारतमाता चौक, चिंबळी फाटा, बर्गेवस्ती, कुरळी, आळंदी फाटा, नाणेकरवाडी, चाकण
महापालिकेचा २० टक्के हिस्सा
निगडी ते चाकण मेट्रो मार्गाच्या प्रकल्पासाठी एकूण दहा हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चात केंद्र शासनाचा दहा टक्के आणि राज्य शासनाचा दहा टक्के हिस्सा असणार आहे. तर महापालिकेचा खर्चाचा हिस्सा १५ ते २० टक्के असणार आहे. उर्वरित ६० टक्के निधी कर्जातून उभारला जाणार आहे.
निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचा आराखडा प्राप्त झाला आहे. त्या संदर्भात बैठक घेऊन सखोल चर्चा केली जाईल. या आराखड्याचे मुख्यमंत्र्यांकडे सादरीकरण केले जाईल. या प्रकल्पासाठी महापालिकेचा हिस्सा जमीन, निधी या माध्यमातून दिला जाईल. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका
महामेट्रोने निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचा आराखडा मे महिन्यात महापालिकेकडे सुपूर्त केला आहे. आराखड्याबाबत बैठका सुरू आहेत. महापालिकेने मान्यता दिल्यानंतर आराखडा राज्य शासनाकडे पाठविला जाईल. केंद्र शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. – डॉ. हेमंत सोनवणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो