पुणे : महाराष्ट्रात मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू, असा इशारा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिला. येत्या पंधरवड्यात माझ्या विभागाअंतर्गत राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांची बैठक बोलावून त्यांना या संदर्भात सूचना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाषेच्या संवर्धनासाठी मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष करत असलेले काम कौतुकास्पद आहे. शासन म्हणून आम्ही त्यांच्या भूमिकेसोबत राहू, अशी ग्वाही सामंत यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आपलीच भाषा बोलली पाहिजे असा अन्य राज्यातील लोकांचा दबाव मुंबई, ठाणे, मुंब्रा, पुणे येथे काही लोक आणत आहेत. गेल्या तीन महिन्यांत हे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. याबद्दलचा कायदा आहे. परंतु असा दबाव आणून मराठी भाषा बोलल्याबद्दल जर मारहाण होत असेल, तर हा कायदा कडक झाला पाहिजे’, असे सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या विषयासंदर्भात पोलीस अधीक्षकांच्या बैठकीनंतर आवश्यकता भासल्यास शासन अध्यादेश काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांची भेट हा ‘मिशन टायगर’चा भाग नव्हता. पण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदरापोटी कोणी पक्षात येऊ इच्छित असेल तर मिशनशिवायही ते येऊ शकतात, असे खुले आमंत्रण सामंत यांनी दिले.

निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती, या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात बोलताना सामंत म्हणाले, ‘आता हे शहा यांना आणि ज्यांनी सांगितले त्यांना विचारले पाहिजे. राऊत यांना पत्रकार परिषद घेण्याचे व्यसन लागले आहे.’ आता मी त्यांच्या वेळेच्या आधी पत्रकार परिषद घ्यावी म्हणतो आहे, अशी मिश्किल टिप्पणीही सामंत यांनी या वेळी केली.

उद्योग येत असलेल्या ठिकाणी चॅप्टर ६ जाहीर झाल्यानंतर खरेदी-विक्रीचे व्यवहार काही काळ होऊ नयेत अशा पद्धतीचा कायदा करण्याच्या मन:स्थितीत आम्ही आहोत. एकदा प्रकल्प झाल्यानंतर बाहेरच्या कोणाला त्या जमिनी खरेदी करता येणार नाहीत, असा नियम त्या कायद्यामध्ये अंतर्भूत असेल. – उदय सामंत, उद्योगमंत्री

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Minister uday samant warns who disrespect marathi language zws