संजय जाधव, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: रेल्वे स्थानकात प्रवाशांचे सामान तपासण्याच्या नावाखाली गैरप्रकार सुरू असल्याची ओरड सुरू होती. अखेर या प्रकरणी लोहमार्ग पोलीस दलातील सहा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे पुणे रेल्वे स्थानकातील लोहमार्ग पोलिसांच्या बेकायदा कारवायांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाने तक्रारी करूनही लोहमार्ग पोलिसांनी याची दखल घेतली नसल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे.

लोहमार्ग पोलिसांकडून सुरू असलेल्या बेकायदा कारवायांबाबत रेल्वे प्रशासनाला पाठवलेले पत्रही ‘लोकसत्ता’ला मिळाले आहे. रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी ३१ जानेवारीला हे पत्र पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षकांना पाठवले होते. या पत्रात लोहमार्ग पोलिसांकडून सुरू असलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख आहे. याबाबत लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी कारवाई करावी, अशी विनंतीही पत्रात करण्यात आली होती. पत्रात लोहमार्ग पोलिसांचा स्वयंघोषित वाहनतळ आणि दोन तपासणी नाक्यांचाही उल्लेख आहे.

आणखी वाचा- नेमणूक पिंपरी-चिंचवड महापालिकेत; पण ‘हे’ अधिकारी काम पाहतात सातारा नगरपरिषदेचे!

पुणे रेल्वे स्थानकावरील दररोजच्या प्रवाशांची सरासरी संख्या दीड लाख आहे. स्थानकातील प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ताणही वाढत आहे. गर्दीच्या वेळी रेल्वे स्थानकाच्या आवारात आणि बाहेर मोठी वाहतूक कोंडी होते. रेल्वे स्थानकाच्या आवारात लोहमार्ग पोलीस ठाणे असून, त्याबाहेरच लोहमार्ग पोलिसांनी बेकायदा वाहनतळ सुरू केला आहे. या ठिकाणी लोहमार्ग पोलिसांसाठी वाहनतळ असा फलकही लावण्यात आला आहे. या वाहनतळामुळे कोंडीत वाढ होते. रेल्वे स्थानकातून वाहने बाहेर पडण्यात या वाहनतळामुळे अडथळे येतात, असे पत्रात म्हटले आहे.

लोहमार्ग पोलिसांच्या वाहनांसाठी पर्यायी जागी देण्याची तयारीही रेल्वे प्रशासनाने दाखवली होती. पुणे रेल्वे स्थानकात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे स्थानकात स्वतंत्र वाहनतळ आहे. या ठिकाणी लोहमार्ग पोलिसांनी वाहने उभी करावीत. कारण लोहमार्ग पोलिसांच्या सध्याच्या वाहनतळामुळे स्थानकात कोंडी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा- पुणे: गुरुत्वीय भिंगामुळे अदृश्य कृष्णपदार्थाचे दर्शन, अभ्यासाला एक नवी दिशा

लोगमार्ग पोलिसांनी पुणे स्थानकावरील दोन मार्गिकांच्या मध्ये दोन तपासणी नाके बसवले आहेत. त्यातील एक चालू स्थितीत तर एक बंद अवस्थेत आहे. यामुळे मार्गिकांची रुंदी कमी होऊन वाहनांना जाण्यायेण्यासाठी कमी जागा उरते. हे दोन्ही तपासणी नाके दुसरीकडे हलवावेत, असेही रेल्वे प्रशासनाने पत्रात नमूद केले आहे.

बेकायदा प्रवासी तपासणी

रेल्वेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्याचा अधिकार रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) आहे. रेल्वे सुरक्षा दलाकडून प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली जाते. असे असूनही लोहमार्ग पोलिसांकडून बेकायदा पद्धतीने स्थानकाच्या आत प्रवाशांची तपासणी केली जाते. प्रवाशांना नाहक त्रास देण्याचा हा प्रकार आहे. प्रवाशांकडून अनेक वेळा पैसे उकळण्यात आल्याच्या तक्रारी येतात. आताच्या कारवाईने लोहमार्ग पोलिसांकडून सुरू असलेले गैरप्रकार समोर आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Misconduct at the railway station by the railway police itself pune print news stj 05 mrj