पुणे : कचरा मुक्त कसबा झाल्यानंतर आता फ्लेक्स मुक्त कसबा विधानसभा मतदार संघ करण्याचा संकल्प आमदार हेमंत रासने यांनी केला आहे. कसब्यात सार्वजनिक ठिकाणी कोणतेही बेकायदा फ्लेक्स लावणार नाही, अशी घोषणा आमदार रासने यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कसबा मतदार संघातील कचरा समस्या सोडवण्यासाठी आमदार रासने यांनी विविध उपक्रम राबविले. स्वच्छ, सुंदर, विकसित कसबा अभियानाअंतर्गत स्वच्छ भारत स्पर्धेत गेली सात वर्षे पहिला क्रमांक मिळणाऱ्या इंदूर शहराचा स्वच्छता कर्मचाऱ्यांसह अभ्यास दौरा देखील आमदार रासने यांनी केला. माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुनियोजित, गतिमान प्रशासकीय उपाययोजना, प्रबळ राजकीय इच्छाशक्ती, लोकसहभाग आणि फ्लेक्समुक्त शहर ही इंदोरच्या यशाची चतु:सूत्री असल्याचे रासने यांनी सांगितले.

कसबा मतदारसंघाच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा खारीचा वाटा म्हणून सार्वजनिक ठिकाणी बेकायदा जाहिरात फलक, बॅनर लावणार नाही, असे आमदार रासने यांनी सांगितले. स्वच्छता, आरोग्य, पर्यावरण आणि वाहतुकीची कोंडी टाळण्याबरोबर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यास या निर्णयामुळे मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मतदार संघातील विकासासाठी पुढील पाच वर्षाच्या काळात कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायचे, याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भुयारी मार्ग, सारसबाग पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास, महापालिकेच्या डॉ. कोटणीस आरोग्य केंद्राचा पुनर्विकास यांचा समावेश आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचेही आमदार रास्ते यांनी स्पष्ट केले.

आमदार हेमंत रासने यांचा संकल्प…..

  • स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियान
  • मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक असणाऱ्या शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करणार
  • वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी सारसबाग ते शनिवारवाडा (बाजीराव रस्ता) आणि शनिवारवाडा ते स्वारगेट (छत्रपती शिवाजी महाराज रस्ता) भुयारी मार्ग
  • सारसबाग आणि पेशवे उद्यानाचा एकात्मिक विकास
  • ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरातील जुन्यावाड्यांचा प्रश्न
  • नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधेसाठी पुणे महापालिकेच्या डॉ.कोटणीस आरोग्य केंद्राचा पुनर्विकास करणार
  • खडक पोलीस वसाहतीतील धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी
  • मामलेदार कचेरी येथील रखडलेले शासकीय इमारतींचे बांधकाम
  • दुरावस्था झालेल्या पुणे महानगरपालिका वसाहतींचा पुनर्विकास
  • महानगरपालिकेच्या नेहरू स्टेडियमचा खेळासाठी विकास
  • लोकमान्यनगर भागातील म्हाडा प्रकल्पाचा एकात्मिक विकास
  • श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर विस्तारासाठी शासकीय जागा हस्तांतरित करण्याची विनंती
  • श्री कसबा गणपती मंदिर, श्री ओमकारेश्वर मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर यांना ब वर्ग दर्जा मिळणे बाबत प्रयत्न करणार.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla hemant rasane big announcement pune print news ccm 82 ssb