सरसंघचालकांचे प्रतिपादन
संघाकडून समाजाची अपेक्षा वाढते आहे. या वाढलेल्या अपेक्षांमुळे राष्ट्रीय विचारांच्या सर्व संघटनांची जबाबदारीही वाढली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी रविवारी केले.
संघ विचाराने प्रेरित होऊन काम करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध संस्था आणि संघटनांच्या कामांचा आढावा, संघटनात्मक वाढ, सेवाकार्याची स्थिती, पुढील संकल्प याविषयी चच्रेसाठी आयोजित समन्वय बठकीच्या समारोपप्रसंगी भागवत बोलत होते.
संघविचारांच्या कार्याचा प्रभाव सर्वदूर वाढतो आहे. या प्रभावातून परिवर्तन दिसत आहे. या सामाजिक परिवर्तनाचा वेग वाढविण्याचे आवाहन करीत भागवत यांनी आपल्या कुटुंबात व समाजामध्ये कुटुंबप्रबोधनाद्वारे मूलभूत राष्ट्रभावना वाढीस लागेल असे संस्कार व्हावेत ही अपेक्षा व्यक्त केली.
शाखा, स्वयंसेवक, संघ विचाराने काम करणाऱ्या संस्था व संघटनांचे मिळून महाराष्ट्र राज्यात तालुकास्तरापर्यंत ९० हजारांहून अधिक कार्यकत्रे काम करत आहेत. या कार्यकर्त्यांच्या बळावर दोन हजार ३५९ गावांमधून चार हजार ९५५ सेवाकार्य सुरु असल्याचे सांगण्यात आले.
संघाचे अखिल भारतीय अधिकारी संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची बैठकीला उपस्थिती होती.