लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: नोकरीचे आमिष दाखवून टास्क पूर्ण करण्यास सांगून अभियंता तरुणीची तब्बल ३९ लाख ६९ हजार ६५६ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार ६ ते १४ एप्रिल दरम्यान जुनी सांगवी येथे घडला.
याप्रकरणी ३३ वर्षीय अभियंता तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेलीग्राम अॅपवर लिंक पाठविणारी सानवी राठोड, अर्जुन चोप्रा, बोरीवली, कल्याण, चेंबूर येथील बँक खातेधारकांविरोधात गुन्हा दाखल केले आहे.
फिर्यादी हिंजवडीत अभियंता आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी काही टास्क सोडवावे लागतील असे सांगत मोबाइलवर टास्ट दिले. हे टास्ट सोडले की पैसे देतो असे सांगितले. ते पैसे देण्यासाठी आरोपींनी फिर्यादीचा बँक खाते क्रमांक मागितला. त्यानुसार फिर्यादी अभियंता तरुणीने स्वत:च्या बँकेचा खातेक्रमांक दिला.
आणखी वाचा- पुणे: कारागृहांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; ड्रोनचा वापर करणारे महाराष्ट्र देशातील दुसरे राज्य
आरोपींनी सुरुवातीला टास्क पूर्ण केल्याचे ४०० रुपये फिर्यादीच्या खात्यावर टाकले. त्यामुळे फिर्यादीला विश्वास पटला. आरोपींनी दुसरा टास्क सोडविण्यास सांगत विविध खात्यावर फिर्यादीला पैसे मागितले. त्यानुसार फिर्यादीने बँक खात्यावर पैसे भरले. तीन आठवड्यांपासून फिर्यादी पैसे भरत होत्या; पण आरोपींकडून पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव घेतली. सांगवी पोलीस ठाण्याचे गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील तांबे तपास करत आहेत.