पुणे : पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे महिलांमध्ये आरोग्य समस्या वाढू लागल्या आहेत. प्रामुख्याने मूत्रमार्ग संसर्ग आणि योनिमार्ग संसर्गाच्या रुग्णांमध्ये १० ते २० टक्के वाढ झाल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ज्ञांनी नोंदविले आहे. या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.
पावसाळ्यात दर वर्षी महिलांमध्ये मूत्रमार्ग संसर्ग आणि योनिमार्ग संसर्गाचे प्रमाण वाढते. यंदाही त्यात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गिरिजा वाघ म्हणाल्या, की पावसाळ्यातील हवा ओलसर आणि दमट असते. पावसाळ्यात ओलसर कपडे अथवा तंग कपडे वापरल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर ओलसर अंतर्वस्त्रामुळे कॅण्डिडा आणि ई-कोलायसारख्या जीवाणूंच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण होते. त्यातून मूत्रमार्गसंसर्गासह योनीच्या बुरशीजन्य संसर्गात वाढ होते.
आताही अशा रुग्णांमध्ये १० ते २० टक्के वाढ दिसून येत आहे. काही महिला त्रास सुरू झाल्यानंतर जुन्या क्रीम अथवा पावडरचा वापर करतात. त्यामुळे आजार आणखी बळावतो. पावसाळ्यात वाढणारे हे आजार व्यक्तिगत सवयींशी निगडित आहेत. त्यामुळे ते कमी करण्यासाठी या आजारांविषयी अधिकाधिक जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
पावसाळ्यातील हवा थंड वाटत असली, तरी ती दमट असते. त्यामुळे काख आणि जांघेत घाम येतो. हा घाम ओलसर कपड्यांमध्ये मिसळल्यानंतर बुरशीच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होते. पावसामुळे दिनक्रमातही बदल झालेला असतो. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेकडे या काळात अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
महिलांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि दह्याचे सेवन करावे. शरीराच्या एखाद्या भागावर खाज अथवा दाह जाणवल्यास स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. बुरशीजन्य आजार हे वेळीच उपचारांनी लगेच बरे होतात, असे रुबी हॉल क्लिनिकमधील वंध्यत्वतज्ज्ञ डॉ. तेजस गुंडेवार यांनी सांगितले.
लक्षणे कोणती?
– ओटीपोटात दुखणे
– लघवी करताना त्रास
– वारंवार लघवी
– योनिमार्गातून दुर्गंधी
काळजी काय घ्यावी?
– पावसाळ्यात सैलसर आणि सुती कपडे वापरावेत.
– ओलसर कपडे परिधान करणे टाळावे.
– अंघोळीसाठी सौम्य साबणाचा वापर करावा.
– मासिक पाळीतील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे.
– जुन्या क्रीम अथवा पावडरचा वापर टाळावा.
– काही त्रास जाणविल्यास तातडीने डॉक्टरचा सल्ला घ्यावा.