दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : देशभरातून मोसमी वारे माघारी गेले आहेत. यंदा २५ सप्टेंबर रोजी दक्षिण राजस्थानमधून मोसमी वाऱ्यांनी माघारीचा सुरू केलेला प्रवास १८ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला आहे. देशातून मोसमी वाऱ्याची संपूर्ण माघार सामान्य वेळेनुसार झाली आहे.

सामान्यपणे देशातून मोसमी वाऱ्याचा माघारीचा प्रवास १७ सप्टेंबरपासून राजस्थानच्या दक्षिणेकडून सुरू होतो. यंदा आठ दिवस उशिराने २५ सप्टेंबरपासून मोसमी वाऱ्यांनी माघारीचा प्रवास सुरू केला. महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात सहा ऑक्टोबरला माघारीचा प्रवास सुरू झाला. सहा ऑक्टोबरला राज्याच्या ४५ टक्के भागातून मोसमी वारे माघारी गेले होते. नऊ ऑक्टोबरला मोसमी वारे राज्यातून माघारी गेले होते.

आणखी वाचा-रेल्वे प्रवाशांसाठी आकुर्डी स्थानकावर आता लिफ्टची सुविधा

सामान्यपणे राज्यातून दक्षिण कोकणवगळता दहा ऑक्टोबरला मोसमी वारे माघारी जाते. उत्तर कर्नाटक, तेलंगणा आणि ओदिशातून मोसमी वारे सामान्यपणे १५ ऑक्टोबरपर्यंत माघारी जाते. यंदा तीन दिवस उशिराने बुधवारी, १८ ऑक्टोबर रोजी ईशान्य भारतासह उत्तर कर्नाटक आणि उत्तर आंध्र प्रदेशातून मोसमी वारे माघारी गेले आहे.

देशभरात तापमानवाढीची शक्यता

दक्षिण भारतवगळता देशभरातून मोसमी वारे माघारी गेले आहे. त्यामुळे हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. परिणामी दक्षिण भारतवगळता देशात सर्वत्र पुढील काही दिवस कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात ईशान्य मोसमी वारे आणि स्थानिक पातळीवर हवामान पोषक असल्यामुळे दक्षिण भारतात पाऊस सुरू होण्याचा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Monsoon winds return from the country pune print news dbj 20 mrj