पुणे : एका महिलेच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली. केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपण हाच पर्याय शिल्लक होता. त्यामुळे अंगणवाडी मदतनीस असलेली तिची आई मूत्रपिंड देण्यासाठी पुढे आली. कुटुंबांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने खासगी रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. अखेर ससून सर्वोपचार रुग्णालयात अगदी कमी खर्चात ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
पुण्यातील रहिवासी असलेल्या या महिलेची प्रसूती २०२२ मध्ये झाली. त्यावेळी उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडविकाराचे निदान झाले. तिचे माहेर कर्नाटकमधील विजयापुरा येथे आहे. तिथेच तिच्यावर उपचार सुरू होते. तिने वर्षभर उपचार घेऊनही मूत्रपिंडे निकामी झाली. अखेर तेथील डॉक्टरांनी तिला प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. यानंतर अंगणवाडी मदतनीस असलेली या महिलेची आई आणि इतर नातेवाइकांनी तिथे प्रत्यारोपणासाठी खासगी रुग्णालयात चौकशी सुरू केली. सगळीकडील खर्चाचा १५ ते २० लाख रुपयांचा आकडा ऐकून त्यांनी प्रत्यारोपणाचा विषय सोडून दिला. ही रुग्ण महिला दरम्यानच्या काळात डायलिसिसवर होती.
या रुग्ण महिलेचा पती चालक म्हणून पुण्यात काम करतो. त्याला ससूनमध्ये कमी खर्चात प्रत्यारोपण होत असल्याची माहिती मिळाली. त्याने ससून रुग्णालयात चौकशी केल्यानंतर हे शक्य असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. नात्यातील एखाद्या व्यक्तीने मूत्रपिंड दान दिल्यास तातडीने प्रत्यारोपण शक्य होईल, अशी माहिती ससूनमधील अवयव प्रत्यारोपण समन्वयक सत्यवान सुरवसे यांनी कुटुंबीयांना दिली. त्यानंतर रुग्ण महिलेची आई मूत्रपिंड देण्यासाठी पुढे आली.
मूत्रविकारतज्ज्ञ डॉ. संदीप मोरखंडिकर आणि डॉ. निरंजन आंबेकर यांच्या सल्ल्यानुसार रुग्ण महिलेच्या आईचे मूत्रपिंड घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार आईच्या आवश्यक त्या सर्व तपासण्या करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. अखेर ७ ऑगस्टला या महिलेवर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. डॉ. पद्मसेन रणबागले, डॉ. लता भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली. यात डॉ. हरिदास प्रसाद, डॉ. संजय मुंडे, डॉ. निरंजन आंबेकर, डॉ. संदीप मोरखंडीकर, डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. राजेश श्रोत्री, डॉ. हर्षद तोष्णीवाल, डॉ विवेक बारेकर यांचा सहभाग होता.
ससूनमध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कमी खर्चात आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केल्या जातात. याव्यतिरिक्त रुग्णांना रुग्णालयात उपलब्ध नसलेली औषधे, लशी, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, शस्त्रक्रियेनंतरच्या आवश्यक रक्त, लघवी व अन्य प्रकारच्या तपासण्यांसाठी खर्च करावा लागतो. सवलतीच्या दरात सर्व औषधे व तपासण्या उपलब्ध करून दिल्यामुळे हा खर्चही कमीतकमी होतो. यासाठी सामाजिक संस्थांकडून मदत मिळवून दिली जाते. – डॉ. एकनाथ पवार, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय