बारामती: लोकसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी काहीच दिवसांत राज्यसभेवर झालेली निवड आणि त्यानंतर थेट तालिका अध्यक्षपदी निवड झालेल्या खासदार सुनेत्रा पवार आता बारामतीतील विकासकामात लक्ष घालू लागल्या आहेत.आज सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील कन्हेरी येथे चालू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. त्यामध्ये ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी, वृक्ष लागवड, झुलता पूल, नर्सरी,  बोटिंग, इत्यादी कामाची पाहणी केली. यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. गेल्या काही वर्षांपासून त्या पडद्याआडून कार्यकर्त्यांना पाठबळ देत असल्या, तरी प्रत्यक्षात राजकीय पटलावर जास्त सक्रिय नव्हत्या. त्यांचा सामाजिक कार्यावर जास्त भर होता.

मात्र, लोकसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याचे काम केले आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अनुपस्थितीत बारामतीतील विविध प्रश्नावरही लक्ष देऊ लागल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची धुरा असल्याने त्यांना राज्यभर दौरे करावे लागत आहेत. दर रविवारी अजित पवार हे बारामतीत उपस्थित राहून विकास कामांचा आढावा घेत असतात. मात्र, राज्य आणि पक्षाचा कारभार पाहताना बारामतीकडे पूर्वीप्रमाणे लक्ष देणे वेळेअभावी शक्य होत नाही. त्यामुळे आता खासदार सुनेत्रा पवार या बारामतीतील विकास कामांकडे लक्ष देऊ लागल्या आहेत.