MPSC Revised Schedule / पुणे : राज्यातील पूरपरिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (एमपीएससी) नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा पुढे ढकलावी लागली. त्यामुळे ‘एमपीएससी’च्या एकूणच वेळापत्रकावर परिणाम झाला असून, विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक ‘एमपीएससी’ने प्रसिद्ध केले आहे.

‘एमपीएससी’ने याबाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. दर वर्षी पुढील वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वार्षिक वेळापत्रक ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात येते. वेळापत्रक प्रसिद्ध करताना आयोगाच्या आणि स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या इतर संस्थांच्या परीक्षा एका दिवशी येणार नाहीत, याचा विचार करून वेळापत्रक निश्चित करण्यात येते.

शासनाकडून संबंधित संवर्ग पदांसाठी वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल, या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक तयार करण्यात येते. त्यामुळे शासनाकडून वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित वेळेत जाहिरात प्रसिद्ध करणे, परीक्षेचे आयोजन करणे शक्य होते, असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे.

सन २०२५ चे स्पर्धा परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक २२ नोव्हेंबर, २०२४ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार परीक्षांचे आयोजन करण्याचा आयोगाकडून काटोकोर प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, विविध अपरिहार्य कारणांस्तव, उमेदवारांचे हित विचारात घेता काही परीक्षा पुढे ढकलण्यात येऊन सुधारित दिनांकास घेण्यात आल्या असल्या, तरी वेळापत्रकातील सर्व परीक्षा सन २०२५ मध्ये घेण्यात आल्या आहेत.

सन २०२५च्या अंदाजित वेळापत्रकातील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा २०२४ ही परीक्षा शासनाच्या सूचनेनुसार स्थगित ठेवण्याबाबत कळविण्यात आले असल्याने या पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही.

आयोगाच्या वेळापत्रकानुसार, २८ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ घेण्यात येणार होती. मात्र,राज्यातील पूर परिस्थितीमुळे ही परीक्षा आता ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५, आता २१ डिसेंबर रोजी घेण्यात येईल.

वेळापत्रकानुसार ३० नोव्हेंबर रोजी होणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ आता ४ जानेवारी रोजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या तारखा

  • महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा : ९ नोव्हेंबर
  • महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ : २१ डिसेंबर
  • महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ : ४ जानेवारी २०२६