पुणे : पुणे शहर आणि ग्रामीण भागातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, दापोडी, राजगुरुनगर, भोर, आदी स्थानकांमध्ये सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात येणार आहे. या स्थानकांमध्ये प्रतिबंधात्कम उपाययोजनेंतर्गत स्थानकांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवून अनधिकृत फेरीवाले, विक्रेते आणि बाहेरील खासगी प्रवासी वाहनांच्या व्यक्तींना स्थानकांमध्ये प्रवेशास बंदी घालण्याच्या सूचना एसटी महामंडळाच्या सुरक्षा समितीतील पथकाने केल्या आहेत.

स्वारगेट ‘एसटी’ स्थानकावरील महिला अत्याचाराच्या घटनेनंतर सुरक्षाव्यवस्थेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महामंडळाचे सुरक्षा समिती पथक सोमवारी पुण्यात दाखल झाले असून शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे, मंचर या स्थानकांना भेट देत सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली, तर मंगळवारी तळेगाव दाभाडे, राजगुरूनगर, भीमाशंकर आणि भोर या स्थानकांवर पाहणी केली.

सुरक्षा व दक्षता समिती अधिकारी शंकर लाडे, लेखा अधिकारी रोहन गायधनी, स्थापत्य अभियंता राम राशीनकर, विभागीय परिवहन व्यवस्थापक सचिन शिंदे आणि यांत्रिकी अभियंता स्मिता कुलकर्णी सहभागी उपस्थित होते. पुढील दोन ते तीन दिवसात तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रमुख स्थानकांची पाहणी करण्यात येणार असल्याचे यावेळी एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

पथकाने केलेल्या सूचना

– दापोडी, शिवाजीनगर बस स्थानकांमध्ये अतिरिक्त सुरक्षारक्षक नेमावे

– स्थानकांवर पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी

– स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि खासगी प्रवासी वाहनांचे प्रतिनिधींनी मज्जाव करावा

– अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत

– प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे

शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातील महामंडळाच्या स्थानकांमध्ये सुरक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने सुरक्षा समिती पथकाकडून पाहणी करण्यात येत आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. – सचिन शिंदे, विभागीय परिवहन व्यवस्थापक, पुणे.