पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार मान्सूनपूर्व पावसामुळे शहराच्या विविध भागांत पाणी साचत असून, अशा ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेश महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. पावसाळी गटारे तुंबल्याने, तसेच खोदाईमुळे अनेक ठिकाणी पाणी साचते आहे. निगडीतील पवळे पुलाखाली पाण्याचा निचरा होत नसून, निगडी ते दापोडी बीआरटी मार्गातही पाणी साचत आहे. पाणी साचल्याने वाहतूक कोंडीत भर पडली आहे. चिखली, घरकुल, वाकड, कासारवाडी, आकुर्डी येथेही अनेक ठिकाणी पाणी साचत आहे.

या पार्श्वभूमीवर, आयुक्त सिंह यांनी शहरातील धोकादायक इमारतींना नोटीस देण्याबरोबरच तेथील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षितस्थळी हलवण्याचे नियोजन करावे, असे आदेश दिले. ‘पूरस्थितीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना राहण्यासाठी शाळांचे नियोजन करावे, नदीकाठी असणाऱ्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याने अशा नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन करावे,’ असे निर्देशही आयुक्त सिंह यांनी अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, ‘शहरातील ८५ टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. ३१ मे अखेरपर्यंत नालेसफाई पूर्ण केली जाणार आहे. त्यासाठी स्पायडर मशिन घेण्यात येणार आहेत. नालेसफाई झाल्यानंतर पावसामुळे कचरा, माती वाहून आली. कचरा अडकला. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले,’ असा दावा आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केला. ‘आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन विभागाकडे झाडपडी, पाणी साचल्याच्या तक्रारींचे प्रमाण वाढले होते. तक्रार येताच साचलेले पाणी, झाडे रस्त्यावरून हटविण्यात आले,’ असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.

जलद प्रतिसाद पथके

नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्काळ मदत मिळावी, यासाठी जलद प्रतिसाद पथके कार्यान्वित केली जाणार आहेत. या पथकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, स्थापत्य, उद्यान अशा विविध विभागांतील कर्मचाऱ्यांचा समावेश करून रात्रीच्या वेळीदेखील ही पथके कार्यरत ठेवण्यात येणार आहेत.

चेंबरमध्ये कचरा अडकल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले. नालेसफाई, पावसाळी गटारे साफसफाईत काही उणिवा राहिल्या आहेत. त्या दुरुस्त केल्या जातील. नेहमी ज्या ठिकाणी पाणी साचते, तिथे या वेळी पाणी साचले नाही. पाणी साचण्याची नवीन ठिकाणे आढळली आहेत. आरोग्य, बीआरटी विभागाला आठ दिवसांत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.- शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका