पुणे : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या बैठकीत जाऊन गोंधळ घालणाऱ्या घटनेचे पडसाद गुरुवारी महापालिकेत उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी महापालिकेतील कर्मचारी, अधिकारी संघटनांनी एकत्र येत या प्रकाराचा निषेध करत महापालिकेत येऊन अधिकाऱ्यांवर दबाब टाकणाऱ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले. ‘आपण जनतेचे मालक आहोत, असा समज झालेली ‘पिलावळ’ तयार झाली आहे. वेळीच तुमच्या वागणुकीत सुधारणा करा, अन्यथा सुज्ञ पुणेकर तुमची जागा दाखवतील’ असा इशारा महापालिकेतील अधिकाऱ्यांनी दिला.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक किशोर शिंदे आणि पदाधिकाऱ्यांनी बुधवारी महापालिका आयुक्त कार्यालयात गोंधळ घातला. मनसे पदाधिकारी महापालिका आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याने त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यात आला. महापालिकेत झालेल्या या घटनेचा निषेध महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी संघटनांच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले. महापालिकेच्या हिरवळीवर झालेल्या या आंदोलनामध्ये अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त माधव जगताप, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख तसेच कर्मचारी संघटनेच्या मुक्ता मनोहर यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. महापालिकेत आंदोलन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी करत यापुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला.
शहर अभियंता प्रशांत वाघमारे म्हणाले, ‘आपण मालक आहोत, असा समज झालेली ‘पिलावळ’ तयार झाली आहे. महापालिकेचे कोणी मालक नाही, जनता हीच खरी मालक आहे. पुणेकर सुज्ञ आहेत. तेच तुम्हाला जागा दाखवतील. तुम्ही वेळीच वागणूक सुधारा, असा आमचा या पिलावळीला निर्वाणीचा इशारा आहे.’
महापालिकेत कोणीही यावे आणि अधिकाऱ्यांना काहीही बोलावे, अशी मानसिकता तयार होणे चुकीचे आहे. अधिकारी त्यांच्या घरचे नव्हे तर शहराचे काम करतात. आयुक्त हे शांत आहेत. पण असे प्रकार घडल्यास आम्ही ‘अरेरावीला अरेरावीनेच उत्तर देऊ’, असा इशारा परिमंडळ १ चे उपायुक्त माधव जगताप यांनी दिला.
पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘शांतपणे निवेदन देऊन चर्चा करून मुद्दे मांडता येतात. पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तमाशा करणे अत्यंत अयोग्य आहे. असे प्रकार अनेकदा घडले आहेत. अधिकारी शहराच्या विकासासाठीच काम करतात. त्यांच्यामुळेच पुणे चांगले शहर बनले आहे. लोकप्रतिनिधींसाठी आचारसंहिता असलीच पाहिजे. चुकीच्या कामासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आल्यास त्याला विरोध केला पाहिजे.’