पुणे : सिंहगड रस्ता परिसरात गुइलेन बॅरे सिंड्रोमचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेने पाणी तपासणी मोहीम हाती घेतली. या परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी विविध ठिकाणी पाठविण्यात आले. यातून आता महापालिकेच्या पाणीपुरवठ्यासह खासगी टँकर आणि रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्पांचे पाणीही पिण्यास अयोग्य असल्याचे समोर आले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील ७० पाणी नमुन्यांमध्ये जीवाणंसूह विषाणू आढळले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जीबीएसचा उद्रेक झालेल्या सिंहगड रस्ता परिसरातील महापालिकेकडून पुरवठा सुरू असलेल्या पाण्याचे १ हजार ६१८ नमुने पाणीपुरवठा विभागाने पर्वती जलकेंद्रात तपासले. त्यातील १२ नमुने पिण्यास अयोग्य आढळले. त्यात कॉलिफॉर्म आणि ई-कोलाय हे जीवाणू आढळले. याचबरोबर या परिसरातील खासगी टँकरमधील पाण्याचे १८ नमुने पर्वती जलकेंद्रात तपासण्यात आले. त्यातील १५ नमुने पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला असून, अद्याप ३ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. तसेच, या परिसरातील ३६ आरओ प्रकल्पांचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यातील २३ पाणी नमुने पिण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

सिंहगड रस्ता परिसरातील २०६ पाणी नमुने राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्यातील ६ नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणू आढळला आहे. याच वेळी एका नमुन्यात कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आढळला असून, हा नमुना किरकिटवाडीतील मोरया सोसायटीतील नळाच्या पाण्याचा होता. याचबरोबर सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने सिंहगड रस्ता परिसरातील ४३ पाणी नमुने तपासले. त्यात १३ नमुने पिण्यास अयोग्य आढळले असून, त्यातील ६ नमुन्यांमध्ये ई-कोलाय आणि ९ नमुन्यांमध्ये कॉलिफॉर्म जीवाणू आढळले आहेत. नांदेड विहीर, निसर्ग हाईट्स विहीर आणि डीएसके विश्व पाण्याची टाकीतील हे नमुने होते, असे सूत्रांनी सांगितले.

जीबीएसचा उद्रेक

पाणी स्रोत जीबीएस रुग्णसंख्या
नांदेड गाव विहीर ७९
महापालिका पाणी पुरवठा४०
खडकवासला धरण१०
वडगाव बुद्रक जलशुद्धीकरण केंद्र
अज्ञात स्रोत
ग्रामपंचायत
विहिरीचे पाणी
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal water in pune is unfit to drink viruses along with bacteria were found in test pune print news stj 05 mrj