लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे: बिबवेवाडी भागातील सरगम चाळीच्या आवारात झालेल्या खून प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी केला. दारू पिताना चकना मागितल्याने दोघांनी एकाचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोन जणांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली असून, खून झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.

केतन शाम टेमकर (वय १९), ओंकार लक्ष्मण सणस (वय २२, दोघे रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. बिबवेवाडी भागातील सरगम चाळ परिसरातील मोकळ्या जागेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. अनोळखी व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती. बिबवेवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग बिबवेवाडी भागात गस्त घालत होते. त्या वेळी टेमकर आणि सणस यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती खबऱ्याने दिली.

आणखी वाचा-पुणे: ‘इझी पे’ कंपनीच्या प्रतिनिधींकडून साडेतीन कोटी रुपयांची फसवणूक

त्यानंतर पोलिसांच्या पथकाने टेमकर आणि सणसला पकडले. चौकशीत दोघांनी सरगम चाळीच्या परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. दारू पिताना एका अनोळखी व्यक्तीने चकना मागितला होता. चकना न दिल्याने वादावादी झाली. त्यानंतर चकना मागणाऱ्या व्यक्तीला मारहाण करुन त्याच्या डोक्यात दगड घातला, असे टेमकर, सणस यांनी पोलिसांना सांगितले. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त शाहूराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय पतंगे, सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संजय आदलिंग, शैलेश आलाटे, संतोष जाधव, सतीश मोरे, शिवाजी येवले, तानाजी सागर आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murder of one for asking for chakna while drinking liquor bibwewadi murder solved pune print news rbk 25 mrj