पुणे : ‘पुणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत नाही. आवश्यक प्राध्यापक उपलब्ध नाहीत, विद्यार्थ्यांना काही विषय शिकण्यासाठी पिंपरी-चिंचवडमध्ये जा-ये करावी लागते. महाविद्यालयाच्या आकृतिबंधाला मान्यता नाही, अशा अनेक त्रुटींवर नॅशनल मेडिकल कमिशनने (एनएमसी) बोट ठेवले आहे. या त्रुटी दूर करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याने ‘वैद्यकीय महाविद्यालय बंद का करू नये,’ अशी गंभीर नोटीस रुग्णालय व्यवस्थापनाला पाठविली असल्याची माहिती माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहरवासीयांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी महापालिकेने धर्मादाय संस्थेच्या मदतीने मोठा गाजावाजा करून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. मात्र, चार वर्षांनंतरही या महाविद्यालयाला पूर्णपणे मान्यता मिळालेली नाही. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरविण्यामध्ये महापालिका आणि रुग्णालय व्यवस्थापन अपयशी ठरले आहे. परिणामी या महाविद्यालयाच्या माध्यमातून गेली तीन वर्षे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्याचे डॉ. धेंडे यांनी स्पष्ट केले. महाविद्यालय सुुरू करून चार वर्षे झाल्यानंतरही या महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत नाही. पुरेसे प्राध्यापक नाहीत. विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र शिकण्यासाठी पिंपरी-चिंचवडच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये जावे लागत असल्याने याची गंभीर दखल घेऊन ‘एनएमसी’ने ही नोटीस बजाविली आहे.
महापालिकेने नायडू हॉस्पिटलच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. ‘एनएमसी’ने महाविद्यालयासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रशासनाला ठरवीक कालमर्यादा घालून मान्यता दिली आहे. मात्र, अद्यापही आवश्यक बाबींची पूर्तता न केल्याने महाविद्यालय प्रशासनाला नोटीस पाठविली आहे. गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा ही नोटीस देण्यात आली असून, थेट वैद्यकीय महाविद्यालय बंद का करू नये? तसेच प्रत्येक त्रुटीसाठी एक कोटी रुपये दंड आकारण्यात येईल, असेही या नोटिशीत स्पष्ट करण्यात आल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.
पुणे महापालिकेने महाविद्यालयाच्या इमारतीसाठी ६५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. बांधकाम सुरू असून, अद्यापही काम पूर्ण व्हायला आणखी दोन वर्षे लागणार आहेत. पुरेशा सुविधा नसल्याने विद्यार्थी तक्रार करत आहेत. उपचार मिळत नसल्याने रुग्ण तक्रार करत आहेत. कर्मचारीही तक्रार करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष या नात्याने महापालिका आयुक्त याला जबाबदार असणार आहेत, असेही डॉ. धेंडे म्हणाले.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचेही दुर्लक्ष
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी विशेष आग्रही होते. तत्कालीन महापौर आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आता या महाविद्यालयामध्ये असलेल्या समस्यांकडे महापालिका प्रशासन, तसेच राज्यमंत्री मोहोळ यांपैकी कोणीही लक्ष देत नसल्याचा आरोप माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी केला. या त्रुटी दूर न केल्यास विद्यार्थ्यांबरोबर आंदोलन उभारण्याचा इशाराही धेंडे यांनी दिला आहे.