पुणे : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला अतिवृष्टी, पूरस्थितीचा धोका संभवू नये, यासाठी उलवे नदीचा प्रवाह मोहा खाडीत वळविण्यात आला आहे. तसेच, नदीचे चाैपट खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आल्याने खाडीतील पाण्याचा प्रवाह ३० ते ४० टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यामुळे पुढील शंभर वर्षांत विमानतळाला जलसंकटाचा धोका नाही, असा दावा पुण्यातील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राकडून (सीडब्ल्यूपीआरएस) करण्यात आला.
‘मोहा खाडीच्या परिसरात हे विमानतळ उभारण्यात आले असून, या ठिकाणावरून तळोजा, कासाडी, गाढी, काळुंद्री आणि उलवे या पाच नद्यांचा प्रवाह, नैसर्गिक संकटे यानुसार शास्त्रोक्त, तसेच गणिती पद्धतीने संशोधन करण्यात आले. त्यासाठी दोन वर्षे अभ्यास करावा लागला,’ अशी माहिती ‘सीडब्ल्यूपीआरएस’चे संचालक डाॅ. प्रभात चंद्रा यांनी दिली.
ते म्हणाले, ‘तळोजा नदीचा प्रवाह आणि पाणीपातळीत काही बदल होतील. मात्र, ते मोठ्या प्रमाणात नसतील. कासाडी नदीच्या पाणीपातळीत अपवादात्मक परिस्थितीत वाढीची शक्यता आहे. मातीच्या भरावामुळे गाढी नदीचा प्रवाह थोडा बदलेल; पण मोठे परिणाम संभवत नाहीत. काळुंद्री नदीच्या पाणीपातळीत मर्यादित वाढ संभवते. काही ठिकाणी विशेषतः कासाडी नदीच्या वरच्या भागात पाण्याची पातळी थोडी वाढण्याची शक्यता असून, त्या भागात उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. अभ्यासानुसार, या सर्व नदी, खाड्यांमध्ये विमानतळ विकासामुळे जलस्तरात मोेठे बदल होणार नाहीत. संशोधनात्मक चाचण्या, वारंवार तपासण्या आणि निष्कर्षांद्वारे अंतिम टप्पा पूर्ण करण्यात आला.’
‘उलवे नदी मोहा खाडीला जाऊन मिळते. नदीचा प्रवाह बदलताना जैवविविधता, स्थानिकांची उपजीविका आणि पर्यायवरण संतुलन याकडे लक्ष देण्यात आले आहे. अतिवृष्टी किंवा नियमित होणाऱ्या पावसाचे पाणी विमानतळाकडून नदीत सोडण्याऐवजी पूर्वेकडे थेट खाडीत सोडण्याची संरचना तयार करण्यात आली आहे,’ असे डाॅ. प्रभात चंद्रा यांनी स्पष्ट केले.
‘सीडब्ल्यूपीआरएस’चे संशोधन
– शास्त्रीय अभ्यासाबरोबर गणितीय पद्धतीचा अवलंब
– मातीचा भराव किंवा प्रवाह वळविताना संभाव्य धोक्यांवर अभ्यास
– पुढील शंभर वर्षांचा विचार करून विमानतळाची संरचना
– जैवविविधतेचा विचार
– हायड्रोडायनामिक प्रारूपांद्वारे निष्कर्ष
विमानतळाच्या आसपास चार-पाच नद्यांच्या प्रवाहामुळे विमानतळावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संस्थेत प्रारूप तयार करण्यात आले. नद्यांचे प्रवाह काही प्रमाणात वळविण्यानंतर त्याचे परिणाम काय होतील, याचा अभ्यास करण्यात आला. या नद्यांना आतापर्यंत केव्हा पूर आला होता, भविष्यात कधी पूर येऊ शकतो, याचा अभ्यास करून केंद्र सरकारला अभिप्राय कळविण्यात आला. त्यानुसार विमानतळाचे बांधकाम झाले असून, या विमानतळाला पुढील शंभर वर्षे जलसंकटाचा धोका नाही.- डाॅ. प्रभात चंद्रा, संचालक, सीडब्ल्यूपीआरएस
