पुणे : खासदार सुप्रिया सुळे समजूतदारपणा दाखवतात, पण अजित पवार सगळ्यांना ‘ओळखून’ आहेत. ते सगळ्यांना नीट करतील. त्यामुळे, अजित पवार यांच्याकडे काही तालुक्यांची सूत्रे द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याकडे केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि ग्रामीण भागांतील पदाधिकाऱ्यांसोबत शरद पवार यांनी गुरुवारी बैठक घेतली. मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक झाली. या बैठकीत पक्षातील गटबाजीबाबत कार्यकर्त्यांनी थेट पवार यांच्याकडे तक्रार मांडली. गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. पक्षातील गटातटामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेपासून दूर जात आहे, अशा तक्रारींचा पाढा कार्यकर्त्यांनी मांडला.

हेही वाचा – पुणे : बसथांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावल्यास गुन्हे, पीएमपी प्रशासनाचा निर्णय

बैठकीला माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, शिरूरचे आमदार अशोक पवार, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह अन्य तालुका अध्यक्ष उपस्थित होते. या बैठकीत कार्यकर्त्यांनी थेट पवार यांच्याकडे तक्रार केल्याने त्यावर भाष्य करणे टाळले. मात्र, तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार काय निर्णय घेतात याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गटबाजीमुळे वेल्हे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला. भोर, वेल्हे आणि मुळशीत राष्ट्रवादीत मोठी गटबाजी सुरू आहे. कुणालाही तिसऱ्यांदा संधी देऊ नये. तालुक्यात अनेक लोक संघटना आणि नेत्यांना मानत नाहीत. आघाडीचा धर्म असल्याने काँग्रेस आमदार लक्ष देत नाहीत. भोर वेल्हा मुळशी तालुका अजित पवार यांच्याकडे द्यावा. खासदार सुप्रिया सुळे सगळ्यांना समजूतदारपणा दाखवतात. पण अजित पवार सगळ्यांना ओळखून आहेत. ते सगळ्यांना नीट करतील, अशी भावनाही कार्यकर्त्यांनी यावेळी मांडली.

हेही वाचा – साखर उत्पादनात ५० लाख टनाचा टप्पा पार, राज्यात १९७ कारखाने सुरू, मागील वर्षापेक्षा सरस कामगिरी

कात्रज दूध संघ, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची समितीवर पक्षातील पदाधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रोजगार नसल्याने तालुक्यातील अनेक कुटुंबे शहरात स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे तालुका विस्थापित होत आहे. त्यामुळे नवनवीन रोजगार कसे येतील, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे कार्यकर्त्यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp party workers complaint about factionalism to sharad pawar in meeting in pune comment on ajit pawar pune print news apk 13 ssb