पुणे : पुण्यातील ढोले पाटील शैक्षणिक संस्थेने नवीन विश्वविक्रम स्थापन करत पुण्याचा गणेशोत्सव आणखी संस्मरणीय केला आहे. ढोले पाटील शैक्षणिक संस्थेचे सागर उल्हास ढोले पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली संस्थेने सर्वाधिक नागरिकांसह दिवे ओवाळून एकत्रित आरती करण्याचा नवा विश्वविक्रम स्थापित केला असून, या यशस्वी प्रयत्नाने पुण्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक जागतिक तुरा खोवला गेला आहे. या विश्वविक्रमाची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

शरयू नदीच्या काठावर एकाच वेळी सर्वाधिक लोक दिव्यांनी आरती करत असल्याचा उत्तर प्रदेशातल्या अयोध्येतील ‘शरयू आरती समिती’चा दिवाळीतील विक्रम गणेशोत्सवाचे औचित्य साधत संस्थेने मोडला आहे. यासाठी ढोले पाटील शैक्षणिक संस्थेच्या खराडी येथील कॅम्पसमध्ये १ हजार ७२४ नागरिकांच्या सहभागाने गिनेस वर्ल्ड रेकॉर्डच्या सर्व नियमांची पूर्तता करत एकाच वेळी दिव्यांनी आरती करण्यात आली. विशेष म्हणजे आरती करणाऱ्या या सर्व महिला होत्या. या यशस्वी आणि विक्रमी प्रयत्नात संस्थेचे भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिक देखील सहभागी झाले होते.

गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे वरिष्ठ अ‍ॅडज्युडिकेटर स्वप्नील डांग्रीकर यांनी या प्रयत्नाचे परीक्षण केले आणि यशस्वी प्रयत्नांनंतर लगेचच ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सागर उल्हास ढोले पाटील यांना या नवीन गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. हा विक्रम करण्याच्या दृष्टीने सुरुवातीपासून मार्गदर्शन करणारे गिनेस वर्ल्ड रेकॉर्डचे समन्वयक मिलिंद वेर्लेकर या वेळी उपस्थित होते.

आमच्या संस्थेच्या कॅम्पसमध्ये एक सुंदर गणेश मंदिर आहे आणि गेल्या १५ वर्षांपासून येथे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम येथे आयोजित केले जातात. हा नवीन गिनेस वर्ल्ड रेकॉर्ड हा देखील त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असे सागर ढोले पाटील यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक पातळीवर सातत्याने सुरू असलेली युद्धे, आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि अपघात यांमुळे जगात खूप अशांतता आणि नकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. गणपती हे विघ्न विनाशक म्हणून ओळखले जातात. ते सर्व संकटांचा नाश करणारे आहेत. म्हणूनच जागतिक शांती प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आम्ही गणरायाकडे शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना करण्याच्या हेतूने हा विश्वविक्रम केला आहे.-सागर ढोले पाटील, अध्यक्ष, ढोले पाटील शैक्षणिक संस्था