पुणे : भारतीय संविधानातील कायदे सक्षम असून त्याच्याच आधाराने देशातील नक्षलवाद देशातून संपवल्याचे केंद्र आणि राज्य सराकारकडून सातत्याने सांगितले जात आहे, तर याच नक्षलवादासाठी नवीन जनसुरक्षा कायदा कशासाठी आणला, असा प्रश्न राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित करत हा देश कोणाच्या मनमर्जीने चालत नसून फक्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालतो आहे, अशा शब्दात केंद्र आणि राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आणि जनसुरक्षा कायद्याला कडाडून विरोध दर्शविला.

‘आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्ही सत्तेत येऊ शकतो’, त्यामुळे महाराष्ट्र सरकामधील सत्ताधाऱ्यांनी हा कायदा तातडीने मागे घ्यावा, अशी विनंती असल्याचे सांगत सुळे यांनी सरकारला इशारा दिला.देशात राज्यात जनसुरक्षा कायदा आणि सरकारी दडपशाही विरोधात महाविकास आघाडीकडून बुधवारी राज्यभरात जनआंदोलन करण्यात आले. यावेळी सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जनआंदोलनाला सुरूवात केली. यावेळी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सुळे म्हणाल्या, ‘जनसुरक्षा कायद्याचा मसुदा विधिमंडळाच्या सभागृहात मांडला गेला, तेव्हाच महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी या कायद्याला कडाडून विरोध केला होता. याबाबत एक स्वतंत्र समितीही स्थापन करण्यात आली होती. समितीला विविध सूचना देण्यात आल्या, मात्र त्या सूचनांची योग्य अंमलबजावणी झाली नाही. मात्र, संविधान विरोधी कायदे आणल्याची समाजात चर्चा असून विचारवंतांनी देखील याबाबत मत मांडले आहे.

राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे असून तहसीलदार, तलाठी यांना गावगुंडांकडून मारहाण केली जाते, गावगुंडांना पाठिशी घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे, निवडणुकीत मतदान चोरीला जात आहे, महिलांवर अत्याचार, दिवसाढवळ्या वाहनचालकांची लूट, सरकारी नोकऱ्या मिळवून देण्यासाठी तरुणांची फसवणूक असे अनेक प्रकार होत असून सर्वत्र अस्थिर वातावरण निर्माण झाले असून महाराष्ट्राची प्रतिमा देशपातळीवर दररोज मलीन होत असल्याचे सुळे यांनी सांगितले.