पुणे : केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता अभियानाअंतर्गत राज्यातील ५ लाख ६९ हजार ६२५ निरक्षरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यंदा पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी शिक्षण विभागाकडून केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणासोबतच निरक्षर, स्वयंसेवकांचेही सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले.
योजना संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले. शिक्षण विभागाच्या योजना संचालनालयातर्फे नवभारत साक्षरता अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्य, जिल्हा, गट, शाळास्तरावर समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्यासाठी ६ लाख २० हजार आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षात ६ लाख २० हजार उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. तर दोन्ही वर्षांतील १२ लाख ४० हजारांचे उद्दिष्ट २०२४-२५ साठी कायम ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ६ लाख ७० हजार ३७५ निरक्षरांची नोंदणी उल्लास उपयोजनावर झाली आहे. तर ५ लाख ६९ हजार ६२५ निरक्षरांची नोंदणी होणे अपेक्षित आहे.
हेही वाचा…पिंपरीतील ८८ मालमत्तांचा लिलाव, लिलाव प्रक्रियेतील सहभागासाठी दोन ऑगस्टपर्यंत मुदत
या पार्श्वभूमीवर शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण मोहीम ५ ते २० जुलै या कालावधीत राबवण्याबाबत शिक्षण विभागाने निर्देश दिले आहेत. या सर्वेक्षणासह नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण गरजेचे आहे. त्यामुळे निरक्षर व्यक्ती आणि स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची उल्लास उपयोजनावर नोंदणी आणि स्वयंसेवकांसोबत टॅगिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
© The Indian Express (P) Ltd