लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्टाच्या आवारात अख्खी मालमोटार गिळलेल्या खड्ड्याची शनिवारी जोरदार चर्चा झाली. त्यातच हा खड्डा नेमक्या कोणत्या यंत्रणेने बुजवायचा, याचा निर्णय घटना घडून २४ तास उलटून गेल्यानंतरही न झाल्याने अनेक पुणेकरांना हा खड्डा पाहण्याची पर्वणीही साधता आली! एका बाजूला हे खड्डापुराण, तर दुसरीकडे महापालिकेची घोषणा मात्र शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची. आता खड्ड्यांबाबत राष्ट्रपतींनीच नाराजी व्यक्त केलेली असल्याने पंतप्रधानांच्या आगामी दौऱ्यापूर्वी तरी रस्ते खड्डेमुक्त करण्याची तसदी घ्यावीच लागणार असे दिसते आहे. दरम्यानच्या काळात सिटी पोस्टातील खड्ड्याचे पर्यटनस्थळ होऊ नये म्हणजे मिळवली, असे नागरिक म्हणताहेत.

‘पुण्यात जे घडते, त्याची चर्चा जगभरात होते,’ असे म्हटले जाते. सध्या पुण्यात खड्डेपुराण घडते आहे आणि त्याची चर्चाही जोरदार सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील सिटी पोस्टाच्या आवारात शुक्रवारी संध्याकाळी भला मोठा खड्डा पडून त्यात अख्खी जेटिंग व्हॅन खेचली गेली. व्हॅनचालक आणि त्याच्या सहकाऱ्याने वेळीच गाडीतून उड्या मारल्याने ते बचावले. या घटनेची छायाचित्रे आणि चित्रफीती शनिवारी दिवसभर समाज माध्यमांची विविध व्यासपीठे व्यापून होतीच. पण, त्यात आणखी भर पडली, ती खड्डा कोणी बुजवायचा, या प्रश्नाच्या न मिळालेल्या उत्तराची.

आणखी वाचा-पुणे : दोन आरोपींकडून पाळत ठेवून वनराज आंदेकर यांचा खून

वास्तविक महापालिकेची जेटिंग व्हॅन सिटी पोस्टात गेली होती, ती सांडपाणी वाहिनी तुंबल्याने त्याची सफाई करायला. त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेचा घटनेशी संबंध नाही, असे पालिकेचे म्हणणे. घटना घडली सिटी पोस्टात, जी जागा तांत्रिकदृष्ट्या आहे टपाल खात्याची. पण, इथली जमीन खचण्याला कारणीभूत ठरले असावे, ते पुणे मेट्रोचे या भागात सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम, म्हणून मेट्रोकडेही बोटे दाखवली गेली. त्यातच राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारीही खड्ड्याची पाहणी करून गेल्याने ‘हे त्यांच्या तर अखत्यारीतील काम नाही ना,’ अशा कुजबुजीची भर पडली. महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी तर, राज्य शासनाच्या नियमानुसार हे त्यांचेच काम आहे, असे एक प्रकारे सुचवलेही. यंत्रणा अशा एकमेकांकडे बोटे दाखवत असताना शनिवारी दिवसभरात खड्डा बुजलाच नाही. अखेर, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या अधिकाऱ्यांनी या खड्ड्याची पाहणी केली आणि सांगितले, की या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे तोवर खड्ड्याची जागा बंदिस्त आणि तेथे जाण्यास प्रतिबंध! हे सगळे सुरू असताना शनिवारी दिवसभरात अनेक पुणेकर येऊन खड्डा पाहून गेले आणि त्यांनी आश्चर्याने बोटं तोंडात घातली, ते वेगळेच!

आणखी वाचा-संगीत हेच प्रभाताईंचे पहिले प्रेम, पं. हरिप्रसाद चौरासिया यांची भावना

आता या खड्ड्याची चर्चा एकीकडे आणि दुसरीकडे रस्त्यावरील इतर खड्ड्यांच्या डागडुजीबाबत अचानक सुरू झालेली धावपळ. त्याचे झाले असे, की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन आणि तीन सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर असताना त्यांना पुण्यातील खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला होता. पुण्यातील या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली. आता खुद्द राष्ट्रपतींना त्रास झाल्याने आणि त्याबाबत पत्रच आल्याने पुणे पोलिसांनी त्वरेने महापालिकेला एक पत्र पाठविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर आहेत. तेव्हा पुन्हा नाचक्की नको, म्हणून, ‘पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजवा,’ अशी सूचनाच या पत्रात पोलिसांनी महापालिकेला केली आहे. त्यावर लगेच लगबग करून आवश्यक तेथे रस्तेदुरुस्ती तातडीने केली जाईल, असे पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी कळविले आहे.
खड्डेकहाणी कधी सुफळ, संपूर्ण होईल कुणालाच माहीत नाही. पण, सध्या तरी रस्त्याने चालताना अचानक जमीन दुभंगली आणि धरतीने आपल्याला पोटात घेतले, तर काय होईल, असा विचार करून पुणेकरांच्या पोटात मात्र मोठा ‘खड्डा’ पडला आहे!

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No decision has been taken on mechanism to fill pothole in city post premises after 24 hours pune print news mrj