पुणे : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एक कोटी ९२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी एकाला अटक केली.

सचिन विलास कांबळे (वय ४२, रा. अमृत बंगला, थेरगाव, पिंपरी-चिंचवड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कांबळे आणि तक्रारदार व्यावासायिकाची गेल्या वर्षी ओळख झाली होती. कांबळे याने लोहगाव परिसरात खासगी कार्यालय सुरु केले होते. तक्रारदार व्यावसायिक लोहगाव भागात राहायला आहे.

आरोपीने व्यावसायिकाला गुंतवणुकीवर सात टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. व्यावसायिकाने सुरुवातीला ३३ लाख ८० हजार रुपये गुंतविले. तक्रारदार आणि परिचितांनी कांबळे याच्याकडे एकूण मिळून एक कोटी ९२ लाख ९५ हजार रुपये गुंतवणुकीस दिले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना सुरुवातीला परताव्यापोटी काही रक्कम देण्यात आली. त्यानंतर कांबळेने त्यांना परताावा देणे बंद केले. परताव्याबाबत विचारणा केल्यानंतर कांबळेने टाळाटाळ सुरू केली.फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यात गुंतवणुकदारांनी तक्रार अर्ज दिला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद शेळके तपास करत आहेत.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ५२ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने दोघांची ५२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वाघोली आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबत एका तरुणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण समाज माध्यमातील जाहिरात पाहत होता. त्यावेळी शेअर बाजारातील गुंतवणूक विषयक जाहीरात त्याने पाहिले. या जाहिरातीतील लिंक उघडल्यानंतर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. चोरट्यांनी तरुणाला समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करुन घेतले.

तरुणाने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. गुंतवणुकीवर परतावा मिळाल्याचे चोरट्यांनी भासविले. तरुणाने चोरट्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने ३७ लाख ८४ हजार रुपये गुंतविले. गुंतवणूक केल्यानंतर त्याला प्रत्यक्ष परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बागल तपास करत आहेत. कोंढवा भागातील एका महिलेची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी १४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध कोंडवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख तपास करत आहेत.