पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी सहयोगी खासदार संजय  काकडे यांनी भूगाव येथे केलेल्या बेकायदा बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के. के. तातेड यांनी दिले. मुळशी तालुक्यातील मौजे भूगाव येथे  दीपक विश्वास कदम यांच्या मालकीची (गट क्रमांक ८/ १, पे.२२.२३ आर) जमीन आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> शिवसेना ठाकरे गटाच्या पिंपरी महिला संघटिकेसह ८ जणांची हकालपट्टी

या जमिनीच्या दक्षिणेकडे बाजूस असलेला रस्ता गेले अनेक वर्षांपासून कदम वापरत आहेत. संबंधित रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) प्रस्तावित केले आहे. या जमिनीच्या आजूबाजूच्या जागा काकडे यांनी बेकायदा मिळवल्या. कदम वापरत असलेल्या रस्त्यात काकडे यांनी एक कमान आणि प्रवेशद्वार बांधले. काकडे यांनी या बांधकामासाठी पीएमआरडीकडून परवानगी  घेतली नव्हती, अशी तक्रार दीपक कदम यांनी त्यांचे वकील ॲड. किरण कदम यांच्या मार्फत मानवी हक्क आयोगाकडे केली होती.

हेही वाचा >>> चिंचवड मतदार संघातील भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना ‘पेड न्यूज’ प्रकरणी नोटीस

कमान आणि प्रवेशद्वारामुळे कदम वापरत असलेला रस्ता कायमस्वरुपी बंद होणार आहे. त्यामुळे कदम यांच्या जाणे-येण्याच्या हक्कावर गदा येऊन मानवी हक्कांची पायमल्ली झाली आहे, असे  दीपक कदम यांनी तक्रारीत नमूद केले होते. या तक्रारीवर राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती के. के. तातेड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. काकडे यांनी केलेल्या बेकायदाा बांधकामाबाबत पीएमआरडीएकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. पीएमआरडीएने दखल घेतली नसल्याचे ॲड. कदम यांनी मानवी हक्क आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. पीएमआरडीएला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्याची मागणी ॲड. कदम यांनी केली. न्यायमूर्ती तातेड यांनी ॲड. कदम यांची मागणी मान्य केली आणि काकडे यांनी केलेल्या बेकायदा बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Order for inquiry illegal construction in former mp sanjay kakde bhugaon pune print news rbk 25 ysh