पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला असून धरणातून एक हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी दुपारपासून पावसाची संततधार सुरू होती. रात्रीही पावसाची रिमझिम होती. सोमवारी सकाळी पाऊस सुरूच होता. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, सांगवी, ताथवडे, मामुर्डी, वाकड, पिंपळेगुरव, पिंपळेनिलख परिसरात जोरदार पाऊस झाला. शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

नद्यांमध्ये धरणातून विसर्ग  केला जात आहे.  पवना धरण शंभर टक्के भरले असून पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून एक हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नदीत करण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे.

पावसाच्या प्रमाणानुसार आणि येव्यानुसार धरणातून नदीपात्रात होणाऱ्या विसर्गाचे प्रमाण अवलंबून असल्याचे पवना धरण पूर नियंत्रण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

रस्ते जलमय

शहरात रविवारपासून पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील रस्ते जलमय झाले आहेत. जलमय रस्त्यांवरून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.

पवना धरण शंभर टक्के, पाणीपुरवठा दिवसाआडच…

समन्यायी पाणी देण्याचे कारण देत २५ नाेव्हेंबर २०१९ पासून शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. मागील सहा वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांची दररोज पाणीपुरवठा देण्याची मागणी आहे. एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात असल्याने सर्वांना मुबलक आणि सुरळीत पाणीपुरवठा होत असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा दावा आहे. आता धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे दररोज पाणीपुरवठा होईल अशी शहरवासीयांना अपेक्षा होती. परंतु, आंद्रा आणि भामा आसखेड धरणातून वाढीव पाणी आल्याशिवाय दररोज पाणीपुरवठा केला जाणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.