पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने आगामी अर्थसंकल्पासाठी (२०२६-२७) कामे सुचविण्याच्या केलेल्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत महापालिकेच्या आठ प्रभागांमधून दोन हजार ७०० नागरिकांनी कामे सुचविली आहेत. नागरिकांना १५ सप्टेंबरपर्यंत कामे सुचविता येणार आहेत. गेल्या वर्षी या उपक्रमात २ हजार २७९ नागरिक सहभागी झाले होते.
‘अर्थसंकल्पात नागरी सहभाग’ या उपक्रमाला १५ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली. त्यानंतर नागरिकांना ऑनलाइन कामे सुचविणे, अभिप्राय देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देऊन कामे सुचविली आहेत. यामध्ये रस्त्यांचे नूतनीकरण, पदपथ बांधकाम, उद्यान विकास, जलनिस्सारण सुधारणा आणि नागरी सुविधा यांसह विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. नागरिकांनी सुचविलेल्या कामासाठी त्यांच्या प्रभागातून वसूल होणाऱ्या मालमत्ताकराच्या दहा टक्के रकमेची तरतूद केली जाते. त्यानुसार गेल्या वर्षी प्राप्त झालेल्या नागरिकांच्या सूचनांचा विचार करून आणि कामांचा प्राधान्यक्रम ठरवून १३६ कोटी ९८ लाख इतक्या निधीची तरतूद ४९९ कामांसाठी करण्यात आली होती.
असे सुचवा काम!
नागरिकांना महापालिकेच्या pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरून काम सुचवता येईल.
तसेच नागरिक या https://www.surveymonkey.com/r/D8TBZRH लिंकला भेट देऊन ऑनलाईन अभिप्राय नोंदवू शकतात.
पीसीएमसी स्मार्ट सारथी ॲप डाउनलोड करून तेथेही नागरिकांना अभिप्राय नोंदवता येईल.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमाची माहिती महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना दिली जात आहे. महाविद्यालयीन विद्यार्थीही कामे सुचवित आहेत. विद्यार्थ्यांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश केला जाणार आहे. शहराचा विकास वेगाने होत असून, या विकासाला आकार देण्यात नागरिकांना सक्रिय सहभागी होता यावे, यासाठी ‘अर्थसंकल्पात नागरी सहभाग’ उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी, तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त अण्णा बोदडे यांनी केले.
या उपक्रमाला गेल्या वर्षाच्या तुलनेत जास्त प्रतिसाद मिळाला आहे. यावरून महापालिकेवर असणारा नागरिकांचा विश्वास दिसून येतो. शहराच्या विकासाला आकार देण्यात सक्रिय सहभागी होण्याची नागरिकांची इच्छा दिसून येते, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह म्हणाले.