पिंपरी- चिंचवड : सोनसाखळी चोरट्याला पिंपरी- चिंचवडच्या मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. सराईत आरोपीकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी गौरव अनिल सरोदेला अटक करण्यात आली आहे. सोनसाखळीचे चार गुन्हे, घरफोडीचे चार, दुचाकीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.

सराईत गुन्हेगार गौरव अनिल सरोदे हा लाल आणि निळी हुडी घालून एकट्या महिलेला गाठून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार व्हायचा. अशी घटना चिखली आणि रावेत परिसरात घडली. दोन्ही घटनेमधील आरोपी हा एकच आहे. असा संशय पोलिसांना होता.

सीसीटीव्ही देखील तपासण्यात आले. गौरव सरोदे हा चाकण परिसरात राहत असल्याचं निष्पन्न झालं. त्याला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला, पण याबाबत त्याला कुणकुण होताच पळ काढला. मालमत्ता विरोधी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ किलोमीटर पाठलाग करून सराईत गुन्हेगार गौरल ला पकडण्यात आलं. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.