पिंपरी : इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता वाढावी आणि स्वच्छ पाणी शहरवासीयांना मिळावे, यासाठी बंधाऱ्यातील गाळ यांत्रिकी पद्धतीने काढण्यात येणार आहे. पाण्याबराेबर वाहून येणाऱ्या कचऱ्यामुळे पंप बंद पडू नये, यासाठी उच्च दर्जाची चाळणी बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी दीड कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून शंभर आणि एमआयडीसीकडून २० असा ६३० दशलक्ष लीटर (एमएलडी) पाणी पुरवठा दररोज केला जातो. शहराची लोकसंख्या वाढत असताना पाण्याची मागणीही वाढत आहे. त्यामुळेच भामा आसखेड धरणातून १६७ आणि आंद्रा धरणातून शंभर असे २६७ दशलक्ष लीटर पाणी शहरासाठी राखीव करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून पाणी शहराला मिळण्यास सुरूवात झाली आहे. आंद्रा धरणातून शंभर दशलक्ष लीटर पाणी इंद्रायणी नदीत साेडून महापालिका निघाेजे येथील बंधाऱ्यावरून उचलते. या पाण्यावर चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केल्यानंतर भोसरी, चिखली, मोशी, चऱ्होली आदी समाविष्ट गावांना दिले जात आहे.

निघोजे बंधारा परिसरात मोठ्या प्रमाणात गाळ जमा झाला आहे. शेवाळ तयार झाले आहे. पुरेशा प्रमाणात पाणी साठा होत नसल्याने या बंधाऱ्याच्या परिसरात साचलेला गाळ काढण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. निघोजे बंधाऱ्याच्या गाळामुळे पाणी साठा कमी होत आहे. यामुळे बंधाऱ्यातील गाळ यांत्रिक पद्धतीने काढण्यात येणार आहे.

तसेच पाण्याबराेबर वाहून येणारे प्लास्टिक, कापडासह विविध कचऱ्यामुळे पंपाद्वारे पाणी खेचण्यास अडचण येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी उच्च दर्जाची चाळणीही बसविण्यात येणार आहे. चाळणी बसविल्यानंतर शुद्ध पाणी मिळेल. गाळ काढल्यानंतर बंधाऱ्यात पाणी साठा वाढणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात तीन ठेकेदारांनी सहभाग घेतला. त्यापैकी नऊ टक्के कमी दराची निविदा स्वीकारण्यात आली आहे. यासाठी एक कोटी ४८ लाख ४४ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. या खर्चाला आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.

इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्यात गाळ वाढला आहे. पाण्याबरोबर विविध प्रकारचा कचरा येत असल्यामुळे पंपाद्वारे पाणी खेचण्यास अडचणी निर्माण हाेत आहेत. त्यासाठी बंधाऱ्यातील गाळ काढून उच्च दर्जाची चाळणी बसविण्यात येणार आहे. – महेश कावळे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका