पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या आरक्षण साेडतीमध्ये प्रभाग क्रमांक १९ आणि ३० मधील आरक्षणामध्ये बदल करण्यात आला आहे. १९ मधील ‘ब’ व ‘क’ आणि ३० मधील ‘क’ आणि ‘ड’ जागेच्या आरक्षणात बदल झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सुचविलेल्या दुरूस्ती नुसार हा बदल करण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ११ नाेव्हेंबर राेजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. निवडणूक चार सदस्यीय पद्धतीने होणार असून ३२ प्रभाग आहेत. नगरसेवक संख्या १२८ जागा असून यामध्ये ६४ महिला आणि ६४ पुरूषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) दहा पुरुष दहा महिला अशा २०, अनुसूचित जमाती (एसटी) दोन महिला एक पुरुष अशा तीन, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी १७ महिला आणि १७ पुरुष अशा ३४ जागा आहेत. खुल्या गटात ७१ जागांमध्ये महिलांसाठी ३५ जागा आरक्षित आहेत.
एम्पायर इस्टेट-आनंदनगर-भाटनगर प्रभाग क्रमांक १९ मध्ये यापूर्वी नागरिकांचा मागास प्रवर्ग ‘ब’ जागेवर महिला आरक्षण हाेते. ते आता फक्त नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग झाले आहे. ‘क’ जागा सर्वसाधारण होती. आता बदलामध्ये महिलेसाठी राखीव झाली आहे.
दापाेडी-फुगेवाडी प्रभाग क्रमांक ३० मधील ‘क’ जागा नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित झाली हाेती. यामध्ये बदल करून आता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी ही जागा राखीव करण्यात आली आहे. ‘ड’ जागा यापूर्वी सर्वसाधारण महिलेसाठी हाेती ती आता सर्वसाधारण करण्यात आली आहे. यामुळे माजी नगरसेविका आशा शेंडगे यांचा मार्ग सुकर झाला आहे.
आरक्षण सोडतीवर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारणार
महापालिकेच्या प्रभागनिहाय आरक्षण सोडतीवर हरकती व सूचना सोमवारपासून (१७ नोव्हेंबर) स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. सूचना व हरकती महापालिका भवनातील तळमजल्यावरील निवडणूक विभागात, तसेच सर्व आठ क्षेत्रीय कार्यालयांत लेखी स्वरूपात स्वीकारण्यात येणार आहेत.
आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आली होती. आयोगाने दोन प्रभागातील आरक्षणामध्ये बदल सुचविले आहेत. त्यानुसार बदल करून आरक्षण सोडत शासन राजपत्र, महापालिका संकेतस्थळ, निवडणूक कार्यालय, सर्व क्षेत्रिय कार्यालयात प्रसिद्ध केली आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.
