पिंपरी : जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना मोरवाडीत घडली.
विजय बन्सीलाल कुर्मी (३५, लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साहिल उर्फ बजरंग संदीप जानराव (२०, अजमेरा, पिंपरी), सार्थक शंकर कागदे (१९, नेहरुनगर, पिंपरी), आसीफ उर्फ सिराजुदिन आल्लवद्दीन खान (२०, मोरवाडी, पिंपरी) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि आरोपी यांच्यात मागील काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली आणि त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा गटटू आणि काठीने मारहाण केली. तसेच, त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. पोलिसांनी साहिल, सार्थक आणि आसिफ या तिघांना अटक केली आहे. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.
काळेवाडी मारहाण केल्याचा जाब विचारल्याने एकास मारहाण भावाला मारहाण करणाऱ्यांना जाब विचारल्यामुळे एका व्यक्तीच्या डोक्यात लाकडी फळीने मारून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना काळेवाडी येथे घडली. एका व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या भावाला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना, आरोपींनी त्यांना अडवले. फिर्यादींनी आरोपींना “माझ्या भावाला का मारले” असे विचारले असता, आरोपींनी त्यांच्या डोक्यात जोरात लाकडी फळी मारून त्यांना गंभीर जखमी केले. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.
तलवार बाळगल्या प्रकरणी एकास अटक
निगडी परिसरात एका व्यक्तीला तलवार बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली. प्रकाश उर्फ पक्या तुकाराम शिंगे (३५, ओटास्किम, निगडी) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस शिपाई बाळू यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओटास्किम निगडी येथे एकजण तलवार घेऊन आला असल्याची माहिती निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावून प्रकाश शिंगे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ५०० रुपये किमतीची एक तलवार जप्त केली आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत.