पिंपरी-चिंचवड : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने गळा आवळून हत्या केली आहे. ही घटना चिंचवडमध्ये आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास घडली आहे. घटनेनंतर आरोपी पत्नीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ४० वर्षीय नकुल भोईर असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून २८ वर्षीय चैताली नकुल भोईर हिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नकुल भोईर हा पत्नी चैतालीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता, यावरून त्यांच्यात अनेकदा वाद झाले. परंतु, शुक्रवारी पहाटे झालेल्या वादातून मुलांचं भवितव्य उघड्यावर आलं आहे. नकुल आणि चैताली यांच्यात पहाटे वाद झाले. यातूनच प्रकृतीने भारदस्त असलेल्या चैतालीने कापडाने नकुलचा गळा आवळून हत्या केली. दोन आणि पाच वर्षांची मुलं आतील रूममध्ये झोपली होती, तेव्हा हा सर्व थरार बाहेरच्या रूममध्ये सुरू होता.
आज सकाळी ही घटना समोर आल्यानंतर चैतालीला चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नकुल आणि चैताली यांचा साडी सेंटरचा व्यवसाय होता. असं असताना नेहमीच्या वादातून आणि सतत चारित्र्यावर संशय घेतल्याने पत्नीने पतीची हत्या केली आहे. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलिस घेत आहेत.
पहाटे पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. पत्नीने पतीचा कापडाने गळा आवळून हत्या केली. चिंचवड पोलिसांनी चैताली भोईरला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे. – पोलिस निरीक्षक गोसावी
