पिंपरी : एका मुलाने घरात राहण्याच्या कारणावरून आपल्या आई-वडीलांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण केली. तसेच, त्याने वडीलांना लोखंडी सळईने मारून त्यांच्या हाताला फ्रॅक्चर केले. ही घटना चिखली येथे घडली.

या प्रकरणी ५२ वर्षीय वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २४ वर्षाच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा आरोपी याने घरात राहण्याच्या कारणावरून फिर्यादी आणि फिर्यादीच्या पत्नीला शिवीगाळ, दमदाटी, धक्का बुक्की व हाताने मारहाण केली.

इतकेच नव्हे, तर त्याने सदनिकेच्या गॅलरीमध्ये असलेल्या लोखंडाच्या सळईने फिर्यादीच्या उजव्या हातावर मारून त्यांना गंभीर जखमी केले. ज्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. चिखली पोलीस तपास करत आहेत.

हॉटेल मालकाला कोयत्याने मारहाण, कोयते हवेत फिरवून दहशत

एका हॉटेल मालकास मारहाण करून, त्यांच्या डोक्यात लोखंडी कोयता मारला, तसेच हॉटेलमधील साहित्याचे नुकसान करून कोयते हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना थेरगाव येथे घडली.

या प्रकरणात कृष्णा बब्रुवान आयतनबोने (२८, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भिमा राजु यादव (२३, धायरी) आणि ओमकार रामचंद्र हिरगुडे (१९, मेतेनगर, धायरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णाच्या हॉटेलसमोर मोटार उभारणे आणि हॉटेलसमोर उलटी केल्याच्या कारणावरून वाद झाला. भीमा याने फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लोखंडी कोयता मारला. ओमकार याने फिर्यादीच्या मावस भावास मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डाव्या हाताच्या पंजाला जबर जखमी केले.

आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या हॉटेलमधील कुटुंबियांना विटा व लाकडी बांबुने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांनी हॉटेलमधील खुर्ची, टेबल व भांडी यांचे नुकसान केले आणि हातातील कोयते हवेत फिरवून समाजात दहशत निर्माण केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

चऱ्होलीत जुन्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण; महिलेसह एका मित्रालाही दुखापत

जुन्या वादाच्या कारणावरून भावकीतील तिघांनी एका तरुणाला कुऱ्हाडीने मारहाण केली. दरम्यान, भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या पत्नीला आणि मित्रालाही त्यांनी मारहाण करून जखमी केले. ही घटना चऱ्होली बुद्रुक येथे घडली.

या प्रकरणात सदाशिव आबासाहेब भोसले (६६, चऱ्होली बुद्रुक) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेंद्र प्रकाश भोसले, गोरख प्रकाश भोसले या दोघांना अटक केली असून एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा निलेश हा आपल्या राहत्या घराबाहेर उभा असताना, भावकीतील आरोपींनी जुन्या वादाच्या कारणावरून त्याला शिवीगाळ करून कुऱ्हाडीने मारहाण केली. दरम्यान, भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या फिर्यादींची पत्नी आणि मुलाच्या मित्राला देखील आरोपींनी मारहाण करून जखमी केले आहे. दिघी पोलीस तपास करत आहेत.

देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस बाळगल्याप्रकरणी एकाला अटक

बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि जिवंत काडतूस विनापरवाना जवळ बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी फाटा येथे केली.

या प्रकरणी पोलीस शिपाई संदीप सोनवणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अजित दगडू रगडे (२४, बंगलावस्ती, मेदनकरवाडी, खेड, पुणे मूळ गाव- आकोणी, कर्जत, अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजित रगडे याने आपल्या ताब्यात एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस बाळगले. त्याची किंमत ४८ हजार रुपये आहे. हे साहित्य कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीररित्या जवळ बाळगले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट तीनने त्याला अटक केली. चाकण पोलीस तपास करत आहेत.

पिंपरीत तरुणाला अटक, पिस्तूल जप्त

विनापरवाना देशी बनावटीची पिस्तूल आणि जिवंत काडतूस जवळ बाळगल्या प्रकरणी एका तरुणाला पिंपरीत अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलीस शिपाई विकास रेड्डी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अशोक ऊर्फ बंड्या मुंन्नालाल ठाकूर (२२, इंदीरानगर, डिलक्स चौक जवळ, पिंपरी, पुणे, मूळ गाव- धीरकनगर, फीरोजाबाद, आग्रा, उत्तरप्रदेश) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक ठाकूर याने आपल्या ताब्यात एकूण ५० हजार ५०० रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस विनापरवाना जवळ बाळगले. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.