Pimpri Chinchwad Butterfly Flyover Lighting: रंगीबेरंगी झगमगाटाने उजळलेला पूल. विविध रंगांच्या छटा निर्माण करणारी रोषणाई. असा वेगळाच अनुभव थेरगाव ते चिंचवड दरम्यानच्या बटरफ्लाय पुलावरून प्रवास करताना नागरिकांना येत आहे. पवना नदीवर उभारलेला हा पूल आता रोषणाईच्या झळाळीने अधिकच खुलून दिसत असून, रात्रीच्या वेळी पुलावर साकार होणारा हा रंगोत्सव नागरिकांना आकर्षित करत आहे.

पिंपरी- चिंचवड महापालिकेकडून शहरात आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याबरोबरच शहरात सौंदर्यपूर्ण वास्तू उभारण्यावर भर दिला जात आहे. थेरगाव येथे पवना नदीवर पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेला बटरफ्लाय पूल हा त्याचाच एक भाग आहे. हा पूल आता शहराचे एक नवे आकर्षण ठरत आहे. पुलाचे अनोखे डिझाइन हे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे असून, आता महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने पुलावर करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई त्याच्या देखणेपणात अधिकच भर घालत आहे.

या रोषणाईसाठी उच्च दर्जाचे एलईडी लिनिअर वॉश लाईट्स (IP65) बसवण्यात आले आहेत. या लाईट्सना ५१२ डीएमएक्स पॉवरसह आरजीबी तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून, त्यामुळे पुलावरील रोषणाई विविध रंगांच्या छटा निर्माण करत प्रत्येक क्षणी वेगळेच दृश्य साकारते. रात्रीच्या वेळी पुलावरून जाणाऱ्या वाहनचालकांसाठी तसेच परिसरातील नागरिकांसाठी हा अनुभव नेत्रसुखद ठरत आहे. येथील आकर्षक रोषणाईची अनेकजण छायाचित्रे व व्हिडिओ घेत आहेत. त्यामुळे हा पूल फक्त वाहतुकीपुरता मर्यादित न राहता नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे पर्यटनस्थळ ठरत आहे.

“बटरफ्लाय पूल हा केवळ थेरगाव आणि चिंचवड यांना जोडणारा दुवा नसून, पिंपरी- चिंचवड शहराच्या आधुनिक आणि सौंदर्यपूर्ण ओळखीचे प्रतीक आहे. या पुलावरील आकर्षक रोषणाईमुळे नागरिकांना नवा अनुभव मिळत आहे. या पुलाचे सौंदर्य जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” शेखर सिंह- आयुक्त तथा प्रशासक, महापालिक