पिंपरी : डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या कीटकजन्य व जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरे, कंटेनर, बांधकाम स्थळं अशा ११ लाख ४१ हजार ६६३ ठिकाणांची तपासणी केली. त्यांपैकी ७ हजार १६७ ठिकाणी डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. त्यातील एक हजार २९२ जणांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत, तर १२२ नागरिक व आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३ लाख ३६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
पावसाळ्यात कीटकजन्य आजारांमध्ये वाढ होते. त्या पार्श्वभूमीवर, डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका डासांची उत्पत्ती रोखण्याकरिता विशेष मोहीम राबविते आहे. आरोग्य विभागाने आठही क्षेत्रीय कार्यालय हद्दींत तपासणी मोहीम राबविली. शहरातील १ लाख ८४ हजार १०६ घरांची तपासणी करण्यात आली. त्यांपैकी ३ हजार ७९ घरांच्या परिसरात डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आढळून आले. नऊ लाख ५६ हजार ४१८ कंटेनरपैकी ३ हजार ४०१ कंटेनरमध्ये डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याचे आणि ६९७ बांधकामस्थळी अस्वच्छता व पाणी साचल्याचे निदर्शनास आले.
डेंग्यू प्रतिबंधासाठी नियमित औषध फवारणी, घरोघरी माहिती पत्रके वाटप, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण, स्थानिक पातळीवरील जनजागृती कार्यक्रम आणि सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सोमवार ते शनिवार दररोज विविध क्षेत्रांमध्ये नियोजनबद्ध कार्यवाही केली जाणार आहे. यामध्ये रुग्णालये, शाळा, बँका, मॉल्स, सिनेमागृहे, कार्यालये, उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणांमधील डासोत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट केली जात आहेत.
‘ब्रेक द चेन’ मोहीम
डेंग्यूमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी महापालिकेने ‘ब्रेक द चेन’ मोहीम हाती घेतली आहे. प्रतिबंध, संरक्षण आणि त्वरित उपचारांचे त्रिसूत्री धोरण अवलंबिले आहे. प्रतिबंधात्मक उपाय, जनजागृती, स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून शहरात डास निर्मूलन करणे हा मोहिमेचा उद्देश आहे. डास उत्पत्तीची ठिकाणे शोधा व नष्ट करा, स्वतःचे डासांपासून संरक्षण करा, कीटकनाशक फवारणीस सहकार्य करा, ताप व इतर लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पुरेसे पाणी प्या, शरीराची द्रवपातळी संतुलित ठेवा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
आठ विशेष पथकांची नियुक्ती
साथीच्या रोगांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आठ विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय अधिकारी, सहायक आरोग्य अधिकारी, कीटकनाशक निरीक्षक यांचा पथकामध्ये समावेश आहे. ही पथके शहरभर डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यरत राहतील.
नागरिकांनी दर आठवड्याला टाक्या आणि पाणी साठवणाऱ्या भांड्यांची स्वच्छता करावी. पाणी साठवणारी भांडी झाकून ठेवावीत. परिसरात रुग्ण आढळून आल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका
डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभाग विविध उपाययोजना करीत आहे. नागरिकांनी घर आणि परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घ्यावी. वारंवार सूचना देऊनही अंमलबजावणी न केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. – सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका