पिंपरी : शासकीय किंवा महापालिकेची नोकरी मिळविणे तरुण-तरुणीचे स्वप्न असते. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिक पदासाठी निवड होऊनही महापालिकेपेक्षा महसूल विभागातील तलाठी पदाच्या नोकरीला उमेदवारांनी प्राधान्य दिल्याचे दिसून येऊ लागले आहे. लिपिक पदाच्या परीक्षेत १८० जण उत्तीर्ण होऊनही आत्तापर्यंत १२४ जणांनी महापालिकेची नोकरी स्वीकारली आहे. तर, ५६ जणांनी अद्याप नोकरी स्वीकारलेली नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध १५ पदांसाठी एकूण ३८७ जागांसाठी मे २०२३ मध्ये ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासण्याची प्रक्रिया करून अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेतले जात आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे. महापालिकेच्या नोकर भरतीसाठी परीक्षा देणाऱ्या अनेक उमेदवारांनी शासनाच्या महसूल विभागाच्या तलाठी पदासह विविध विभागाची परीक्षा दिली. महापालिकेच्या लिपिक पदासाठी उत्तीर्ण झालेल्या १८० उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना रुजू करून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र, दरम्यानच्या काळात तलाठी भरतीसह इतर परीक्षांचाही निकाल जाहीर झाला आहे.

हेही वाचा…पुणे : सासवड परिसरात कांद्याच्या शेतीत अफूची लागवड

यामध्ये अनेक उमेदवार महापालिकेची लिपिक आणि तलाठी परीक्षेसह शासनाच्या इतर विभागातील परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समोर आले. त्यामुळे निवड झालेल्या १८० लिपिकांपैकी आत्तापर्यंत १२४ लिपिक महापालिका सेवेत रुजू झाले आहेत. ५६ जणांनी अद्याप नोकरी स्वीकारलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी महापालिकेच्या लिपिक पदापेक्षा तलाठी पदासह शासनाच्या नोकरीला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. महापालिका सेवेत नव्याने रुजू झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना महापालिकेची नोकरी कशी चांगली आहे, याबाबत प्रशासनाचे अधिकारी त्यांना समजावून सांगत आहेत.

हेही वाचा…लोकजागर : पाणीकपात करा…

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले की, लिपिक पदासाठी निवड झालेल्या १८० पैकी १२४ जण महापालिका सेवेत रुजू झाले आहेत. ५६ जण अद्यापही रुजू झाले नाहीत. विद्यार्थी महापालिकेसह शासनाच्या विविध विभागातील पदासाठी परीक्षा देतात. या परीक्षांचाही निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये तलाठी पदाची मोठी भरती असल्याने पालिकेत निवड झालेल्या उमेदवारांचा रुजू होण्याचा वेग मंदावल्याचे दिसते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation s clerk exam passed candidates give preference to talathi post pune print news ggy 03 psg