पिंपरी : वैद्यकीय सेवा आणि राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्याच्या उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा सलग पाचव्यांदा राज्यात पहिला क्रमांक आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने जुलै व ऑगस्ट २०२५ महिन्याच्या जाहीर केलेल्या क्रमवारीत महापालिका राज्यात प्रथम क्रमांकावर राहिली.

जुलै महिन्यात ४४.८५ गुणांसह, तर ऑगस्टमध्ये ४३.०१ गुण मिळवून महापालिकेने प्रथम स्थान कायम ठेवले. आरोग्य मंत्रालयामार्फत राज्यातील सर्व महापालिकांच्या आरोग्य सेवांची वेळोवेळी तपासणी करून त्यांच्या कार्यप्रदर्शनाच्या आधारे क्रमवारी जाहीर केली जाते. त्यामध्ये मातृत्व आरोग्य, बाल आरोग्य, लसीकरण, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी), आरसीएच संकेतस्थळ, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, रेबीज नियंत्रण कार्यक्रम, कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, डेंग्यू व मलेरिया नियंत्रण, असंसर्गजन्य आजार नियंत्रण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मानांकन, ई-औषधी, मोफत निदान सेवा, आयुष्मान भारत-आरोग्य व आरोग्य कल्याण केंद्रे, एचआयव्हीएस, आशा कार्यक्रम तसेच प्रशासन व वित्तीय व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या निर्देशकांचा समावेश होता.

सातत्यपूर्ण तपासणी, लसीकरण, महिलांचे व बालकांचे आरोग्य, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांवर नियंत्रण यामध्ये आम्ही सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

वैद्यकीय विभागाने सलग पाच वेळा राज्यस्तरावर पहिला क्रमांक पटकावला आहे. ही राज्यस्तरीय कामगिरी शहरातील प्रत्येकासाठी अभिमानाची आहे. आगामी काळात आणखी नावीन्यपूर्ण उपक्रम म राबवून ही कामगिरी टिकवून ठेवली जाईल, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.