पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता खालावण्यास रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पही कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कारवाई हाती घेतली आहे. उपद्रव शोध पथकाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आणि मोशी परिसरातील नऊ आरएमसी प्रकल्पाची तपासणी करत लाखबंद (सील) केले. वायुप्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना न केलेल्या ३० प्रकल्पांवर कारवाई करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहर चारही बाजूने झपाट्याने वाढत असून टाेलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. बांधकाम प्रकल्पासाठी शहराच्या विविध भागांत आरएमसी प्रकल्पांची संख्याही सातत्याने वाढत आहे. वायुप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आरएमसी प्रकल्पांसाठी नवे आणि अधिक कठोर मार्गदर्शक नियम लागू केले आहेत. मात्र, प्रकल्प चालकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून आले.
प्रदूषण मंडळाने वायुप्रदूषणासाठी कारणीभूत ठरणारे आणि नियमांचे पालन न करणाऱ्या शहरातील ३० प्रकल्पांची यादी महापालिकेच्या पर्यावरण विभागाला दिली आहे. शहरातील पर्यावरणविषयक समस्या व तक्रारींचे तत्काळ निरसन करण्यासाठी महापालिकेने दोन उपद्रव शोधपथकांची नेमणूक केलेली आहे.
या पथकांनी ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आणि मोशी परिसरातील आरएमसी प्रकल्पांची तपासणी केली. यामध्ये नऊ आरएमसी प्रकल्पाच्या ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक असलेली ‘वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टम’ नसणे, मिक्सिंग ऑपरेशन्स खुल्या जागेत, खडी, वाळू व क्रश सँड वाहतुकीदरम्यान ताडपत्रीचा वापर न करणे, अशा बाबी आढळून आल्या. या प्रकल्पांमुळे हवेच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे पर्यावरण विभागामार्फत तत्काळ कारवाई करत प्रकल्प लाखबंद करण्यात आले.
खडी, वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांना ताडपत्रीने झाकावे
प्रकल्पाच्या परिसरात धूळ प्रदूषण नियंत्रणासाठी ‘वॉटर स्प्रिंकलिंग सिस्टम’ वापरावी. मिक्सिंग ऑपरेशन्स बंदिस्त जागेतच करावे, खडी, वाळू, क्रश सँड यांच्या वाहतुकीदरम्यान वायुप्रदूषण होऊ नये, याकरिता वाहनांना ताडपत्रीने झाकावे, आरएमसी प्रकल्प मर्यादित वायुप्रदूषणाच्या पातळीत असल्याचे व निर्धारित कालावधीतच कार्यान्वित ठेवावेत, प्रकल्पाच्या परिसरातील ध्वनीची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावी, असे कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल यांनी सांगीतले.
नियमांचे पालन न करणाऱ्या कोणत्याही आस्थापनास प्रशासन कोणतीही शिथिलता देणार नाही. नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाला प्राधान्य आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड, महापालिका.
पर्यावरणाच्या अनुषंगाने असणाऱ्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथके कार्यान्वित केली आहेत. आरएमसी प्रकल्पाबाबत प्रदूषण मंडळाचे पत्र प्राप्त झाले आहे. ज्या प्रकल्पाच्या ठिकाणी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली किंवा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, त्यावर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
