पिंपरी : वकीलाच्या अशिलाला मदत करण्यासाठी ४६ लाख ५० हजार रुपयांच्या लाच प्रकरणात नाव आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.

संदीप सावंत असे खातेनिहाय चौकशी सुरू केलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. प्रमोद रवींद्र चिंतामणी (वय ४४, रा. दिघी रोड, भोसरी, मूळ, पारनेर, अहिल्यानगर) असे निलंबित केलेल्या फौजदाराचे नाव आहे. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे चार कोटींच्या फसवणुकीचा एक गुन्हा तपासासाठी आहे. या गुन्ह्याचा तपास फौजदार चिंतामणी याच्याकडे होता. अशिलाला मदत करण्यासाठी तसेच, जामीन अर्जावर पोलीस उत्तर (से) दाखल करण्यासाठी चिंतामणीने दोन लाखांची लाच मागितली होती. त्यानंतर चिंतामणीने दोन कोटी रुपये देण्याचा तगादा लावला.

तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीने चिंतामणीला पुण्यात समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत लाचेच्या पहिल्या हप्त्यापोटी ४६ लाख ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्याच्या दिघी येथील घरावर छापा टाकला असता पोलिसांनी ५१ लाख रुपयांची रोकड सापडली. याशिवाय दागिने, इतर कागदपत्रेही जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कारवाईचा बडगा उगारला. फौजदार प्रमोद चिंतामणी याला सेवेतून निलंबित करण्यात आले. तसेच, आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. त्यानंतर आता सावंत यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.