पुणे : महापालिका आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून शहर स्वच्छतेसाठी आग्रह धरणाऱ्या आयुक्त नवल किशोर राम यांनी आता प्रशासनात चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ‘सफाई’चे काम हाती घेतले आहे. बेकायदा जाहिरात फलक उभारणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करा, अशा सूचना दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यास आयुक्तांनी सुरुवात केली आहे.

नगर रस्ता-वडगावशेरी येथील आकाशचिन्ह परवाना विभागाच्या एका निरीक्षकावर निलंबनाची कारवाई आयुक्त राम यांनी केली आहे. शहरातील विविध महत्त्वांच्या चौकांमध्ये, रस्त्यांवर उभारण्यात आलेले जाहिरात फलक, फ्लेक्स यांचा अहवाल महापालिका आयुक्त राम यांनी आकाशचिन्ह विभागासह १५ क्षेत्रीय कार्यालयांकडून मागविला होता.

त्यावेळी नगर रस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयातील परवाना निरीक्षक विनोद लांडगे आणि राजेंद्र केवटे यांनी कोणताही लेखी अहवाल न देता केवळ तोंडी शून्य बेकायदा जाहिरात फलक असल्याचे महापालिका प्रशासनाला कळविले होते. दरम्यान, नगर रस्ता वडगावशेरी क्षेत्रीय कार्यालयाकडून हद्दीत सात बेकायदा जाहिरात फलक असल्याचा अहवाल दिला.

त्यानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आदेश देऊन शहरातील बेकायदा जाहिरात फलकांची माहिती गोळा करून त्यांचा शोध घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पाहणीत नगर रस्ता-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये दिलेल्या आकडेवारीपेक्षा पाचपट म्हणजे ३५ बेकायदा जाहिरात फलक समोर आले. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन बेकायदा जाहिरात फलकांवरील कारवाईबाबत महापालिका प्रशासनाने या दोन्ही कर्मचाऱ्यांकडून लेखी खुलासा मागविला होता.

मात्र, लांडगे आणि केवटे या दोघांनी दिशाभूल करणारा खुलासा दिला. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी लांडगे यांना सेवेतून निलंबित करण्याचा तर केवट यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले. महापालिकेतील सामान्य प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

बैठकीला गैरहजर राहणाऱ्या विभागप्रमुखांना नोटीस

राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी १५० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये केल्या जाणाऱ्या कामांचा आढावा घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या चार विभागप्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे.

महापालिकेत प्रशासकीय सुधारणा आणि प्रशासनाच्या वतीने केल्या जात असलेल्या कामाबद्दल चर्चा करण्यासाठी, तसेच माहिती घेण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्यप्रमुख नीना बोराडे, उपायुक्त वसुंधरा बारवे, अतिक्रमणप्रमुख संदीप खलाटे, अभियंता जगदीश खानोरे हे गैरहजर होते.

कोणतीही पूर्वकल्पना न देता बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे प्रशासनाने त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे. या सर्वांना नोटीसला उत्तर द्यावे लागणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.