पुणे : विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) कारवाई तीव्र केली आहे. गेल्या दोन महिन्यांत विनातिकीट प्रवास करणाऱ्या २,५८७ फुकट्या प्रवाशांवर, तर १,४०० कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, २१ लाख ३३ हजार रुपयांचा दंड केला आहे.
‘तपासणी पथकाने मे आणि जून महिन्यात २,५८७ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून १२ लाख ८९ हजार रुपयांचा दंड आकारला आहे, तर गैरवर्तणूक आणि कर्तव्यात कसूर केल्याबद्दल १४५३ वाहक आणि चालकांवर कारवाई करून आठ लाख ४४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे,’ अशी माहिती ‘पीएमपी’ प्रशासनाकडून देण्यात आली.
‘पीएमपी’ची भाडेवाढ केल्यानंतर गतिमान आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने विशेष उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर नजर ठेवण्यासाठी तपासनीसांची संख्या वाढवली आहे. तसेच, प्रवाशांशी गैरवर्तन आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची माेहीम हाती घेतली आहे.
त्यानुसार, तिकीट तपासनीसांकडून बसच्या दोन्ही बाजूला बोर्ड लावले आहेत का, वाहकाने तिकीट दिले आहे किंवा नाही, चालक वाहन चालवताना मोबाइलवर बोलतो आहे का, अशा अनेक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. यामध्ये दोषी आढळणाऱ्या चालक-वाहकांचा अहवाल तयार करून वरिष्ठांकडे पाठवून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
‘पीएमपी’ प्रवाशांनी स्थानक किंवा थांब्यावर बसताच पुढील पाच मिनिटांच्या आत तिकीट काढणे अनिवार्य केले आहे. मात्र, अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा. – दीपा मुधोळ-मुंडे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल
दंडात्मक कारवाईचा आढावा
महिना – विनातिकीट प्रवासी – कर्मचारी गैरवर्तन
मे – ४,७१,००० ३,७७,४२८
जून – ८,१८,००० ४,६६,६४०
एकूण – १२,८९,००० ८,४४,०६८