पिंपरी- चिंचवड: गुंडा विरोधी पथकाने दोन सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या असून तीन पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती सुरू आहे. यामध्ये दोन सराईत गुन्हेगार आढळून आले आहेत. राकेश वासुदेव येवले आणि प्रसाद गणेश आठवले अशी गुन्हरांची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुंडाविरोधी पथकाने आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांची झाडाझडती सुरू केली आहे. गुन्हेगारांवर वचक राहावा. येन निवडणुकांमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढू नये यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात येत आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक लोंढे, तापकीर यांच्या टीमने वेगवेगळ्या ठिकाणाहून दोघांना अटक केली आहे.

सराईत गुन्हेगार राकेश येवले याच्याकडून दोन पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. त्याच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्ये प्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रसाद गणेश आठवले याच्याकडून एक पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे. दोघांविरोधात वाकड आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या टीमने केली आहे.