पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तत्कालीन पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या हद्दीतील ४६ भूखंडाचा ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. हे भूखंड ८० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे.
या भूखंडामध्ये शैक्षणिक वापराचे ३ भूखंड, वाणिज्य आणि सार्वजनिक सुविधेचे ११ भूखंड, वैद्यकीय वापराचा १ भूखंड, ग्रंथालय आणि संगीत शाळा अशा सार्वजनिक सुविधांसाठी १ भूखंड, फॅसिलिटी क्षेत्रासाठी १ भूखंड आणि ॲमिनिटी स्पेससाठी २९ भूखंड असे एकूण ४६ भूखंड यांचे ८० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्ट्याने वाटप होणार असल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.
तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीधारकांची घोषणा सहा नोव्हेंबर रोजी करण्यात येणार असून, सात नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता संकेतस्थळावर ई- लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर ई- लिलाव प्रक्रियेसंबधी सूचना सविस्तर अटी आणि शर्तीची माहितीपुस्तिका https://eauction.gov.in तसेच https://pmrda.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, यासंदर्भात नोंदणी तसेच निविदांचे दस्तऐवज ३० ऑक्टोबरपर्यंत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहेत, असे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले.