पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत फलकांवर तत्काळ कारवाई करावी. यासाठी गरज पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी. शहरात अनधिकृत फलक आढळल्यास ते तत्काळ हटवावेत, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. सर्व प्रभागस्तरांवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी यासाठी स्वतंत्र पथक नेमावे आणि त्या माध्यमातून कारवाईची मोहीम सातत्याने राबवावी, अशा स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.

महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक सक्रिय झाले आहेत. इच्छुक, माजी नगरसेवकांकडून शहरात जागोजागी विनापरवाना फलक लावले जात आहेत. त्यामुळे शहर विद्रूप दिसत असून, वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अशा फलकांवर तत्काळ कारवाई करावी. शहरात विनापरवाना फलक व बॅनर उभे राहू नयेत, त्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पथके नेमावेत. कारवाईत कोणताही भेदभाव करण्यात येऊ नये, कारवाई सरसकट केली जावी, असे आदेश आयुक्त हर्डीकर यांनी दिले आहेत.

तिघांवर गुन्हे

महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून अनधिकृत फलकांवर नियमित कारवाई सुरू आहे. एक ऑगस्ट ते १७ ऑक्टोबर २०२५ या अडीच महिन्यांत २१ हजार ५१८ अनधिकृत फलक, किऑक्स, बॅनरवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक लाख ८१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अनधिकृत फलक लावल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अनधिकृत फलकांवरील कारवाईला गती दिली जाईल. कारवाईसाठी प्रभागस्तरावर स्वतंत्र पथक नेमले जाईल. या पथकाच्या माध्यमातून कारवाईची मोहीम राबवली जाईल, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त राजेश आगळे यांनी सांगितले.