पुणे : हिमालयीन भागातील बर्फवृष्टी आणि त्यातून उत्तरेकडील राज्यात थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्याने पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्रातील हुडहुडी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीरमधील पर्वतांच्या भागांत सध्या उणे १५ तापमान आहे. भूभागालगतच्या तापमानामध्ये राजस्थानातील चुरू भागांत देशातील निचांकी २.५ अंश उणे तापमान नोंदविले गेले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या तापमानावर पुढील तीन दिवस होऊ शकतो. त्यानंतर, मात्र तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जानेवारीच्या सुरुवातीपासून उत्तरेकडून पश्चिमी चक्रवातांची मालिका सुरू आहे. त्यामुळे हिमालयीन विभागात यंदा मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. त्यातून उत्तरेकडील राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर घट नोंदविली जात आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहून महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्येही तापमानात सातत्याने घट नोदविली जात आहे. मात्र, उत्तरेकडे येणारा प्रत्येक चक्रवात सारखा परिणाम साधताना दिसत नाही. त्यामुळे बाष्पाचा पुरवठा आणि ढगाळ स्थिती निर्माण होऊन तापमानात चढ-उतार होत आहे. त्यामुळेच उत्तरेकडे कडाक्याची थंडी आणि पाठोपाठ पावसाळी वातावरण, तसेच दाट धुक्याचे वातावरणही तयार होत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांवरही दिसून येत आहे.

हेही वाचा – पुणे : संक्रातीला चोरट्यांचा धुमाकूळ, महिलेचे सव्वातीन लाखांचे दागिने हिसकावले

महाराष्ट्रातील किमान तापमानातही गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू आहे. सध्या गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या भागातून थंड वाऱ्यांचे प्रवाह येत आहेत. परिणामी मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागासह उत्तर महाराष्ट्रातील तापमानातील घट कायम आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही तापमान सरासरीखाली आहे. विदर्भात गेल्या आठवड्याच्या तुलनेत तापमान काही प्रमाणात वाढले आहे. मात्र, रात्रीचा गारवा कायम आहे. पुढील तीन दिवसांत राज्यांत सर्वत्र तापमानात काही प्रमाणात घट होईल. त्यानंतर उत्तरेकडील राज्यांत तापमानात वाढ होणार आहे. गुजरातेतही तापमानवाढीचा अंदाज असल्याने राज्यातील तापमानातही तीन दिवसांनंतर काही प्रमाणात वाढ होईल.

हेही वाचा – पुणे : दोन प्रियकरांकडून महिलेचा गळा आवळून खून, तंबाखू माव्याच्या पुडीवरून आरोपी गजाआड

मुंबई, कोकणात तापमानघट

  • मुंबईसह कोकण आणि किनारपट्टीलगतच्या भागांमध्ये सध्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३.५ ते ४.० अंशांपर्यंत घट झाली असल्याने गारवा वाढला आहे. सांताक्रुझ येथे १३.८ अंश, तर हडाणूमध्ये १३.१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली.
  • उत्तरेकडून आणि प्रामुख्याने गुजरात, राजस्थानमधून येणाऱ्या वाऱ्यांमुळे किनारपट्टीच्या भागामध्ये दिवसाच्या कमाल तापमानातही सरासरीच्या तुलनेत ३.५ ते ३.७ अंशांनी घट झाली आहे. त्यामुळे उन्हाचा चटका घटला आहे.
  • जळगाव येथे राज्यातील निचांकी ७.८ अंश किमान तापमान नोंदविले गेले. त्यापाठोपाठ औरंगाबाद येथे ८.८ अंश आणि नाशिक येथे ८.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. त्यामुळे या भागात थंडीचा कडाका अधिक होता.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of increase cold weather increase in maharashtra in next two three days pune print news pam 03 ssb