निर्बंधांमुळे मागणीत ३० ते ४० टक्क्यांची घट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे, ठाणे : घाऊक बाजारात सध्या बटाटय़ांची बेसुमार आवक होत आहे. उत्तरेकडील आग्रा परिसरातील जुन्या बटाटय़ाची आवक सर्वाधिक असून पुणे जिल्ह्यातील तळेगाव बटाटा तसेच मध्य प्रदेशातील इंदूर भागातील नव्या बटाटय़ाचा हंगाम सुरू झाला आहे. उपाहारगृहे तसेच विवाह समारंभातील उपस्थितीवर निर्बंध आल्याने गेल्या आठवडाभरापासून बटाटय़ाच्या मागणीत घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो बटाटय़ाची विक्री २० ते ३० रुपये किलो दराने केली जात आहे.

आग्रा येथील शेतकरी बटाटा शीतगृहात साठवितात. सध्या बाजारात शीतगृहातील जुन्या बटाटय़ाची आवक होत आहे. बटाटय़ांना फारशी मागणी नाही. घाऊक बाजारात एक किलो बटाटय़ाला १० ते १३ रुपये दर मिळाले आहेत. पुण्यातील मार्केटयार्ड तसेच नवी मुंबईतील (वाशी) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बटाटय़ाची आवक मुबलक होत असली तरी, फारशी मागणी नसल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील बटाटा व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील घाऊक बाजारात सध्या दररोज ३० ट्रक बटाटय़ाची आवक होत आहे. एका ट्रकमध्ये साधारणपणे २० टन बटाटा असतो. बाजारात दररोज ५०० ते ६०० टन बटाटय़ाची आवक होत असून सर्वाधिक बटाटा आग्रा परिसरातून विक्रीस पाठविण्यात येत आहे, असे कोरपे यांनी सांगितले.

मागणी का रोडावली?

पुणे, मुंबईतील घाऊक बाजारात सध्या बटाटय़ांची आवक वाढली आहे. करोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्याने गेल्या १५ दिवसांत बटाटय़ाच्या मागणीत ३० ते ४० टक्क्यांनी घट झाली आहे.

 उपाहारगृहचालक, खाद्यपदार्थ विक्रेते तसेच केटिरग व्यावसायिकांकडून असलेली मागणी कमी झाल्याचे बटाटा व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी सांगितले.

तळेगाव बटाटय़ाचा हंगाम सुरू

पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर भागातील शेतकरी तळेगाव जातीच्या बटाटय़ाची लागवड करतात. तळेगाव बटाटा आग्रा येथील बटाटय़ाच्या तुलनेत चवीला कमी गोड असतो. त्यामुळे गृहिणी तळेगाव बटाटय़ाची मागणी करतात. 

मुंबई, ठाण्यातील दर

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज ५० ते ५५ गाडय़ांमधून बटाटय़ाची आवक होत आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो बटाटय़ाला सात ते १५ रुपये असे दर मिळाले आहेत. मुंबई, ठाण्यातील किरकोळ भाजीपाला बाजारात बटाटय़ाची विक्री २० ते ३० रुपये दराने केली जात आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Potato inflows increase in pune mumbai market akp
First published on: 24-01-2022 at 01:10 IST