पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांचे बिगुल कधीही वाजू शकते. यामुळे राज्यातील सर्वच पक्ष जागांची चाचपणी आणि दावा करत आहेत. पुण्यातील मावळ लोकसभेवर आता वंचितने दावा केला असून स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचा इशारा वंचितचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी दिला आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मावळ लोकसभा मतदारसंघाला सर्वच पक्षांची पसंती आहे. शिवसेना शिंदे गटाचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पुन्हा एकदा मावळच्या उमेदवारीवर दावा केला आहे. तर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. वाघेरे यांनी प्रचार देखील सुरू केला आहे.

हेही वाचा : पुणे मेट्रोच्या स्थानकांचे आता नामांतर! जाणून घ्या कोणत्या स्थानकांची नावे बदलणार…

असे असताना आता महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल जाधव यांनी मावळ लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात २०१९ ला झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये ऐनवेळी उभा केलेल्या वंचितच्या उमेदवाराला लाखभर मते मिळाली होती. हा मतदारसंघ आमच्या हक्काचा असून आम्ही यावर दावा केला आहे. वंचित बहुजन आघाडीकडून आधीच २७ जागांवर चाचपणी सुरू असून त्यात पुणे आणि मावळ लोकसभेचा समावेश आहे. अशी मागणी केल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.