-शंतनू दीक्षित

प्रयास हा वैद्याकीय व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील काही व्यावसायिकांनी एकत्र येऊन स्थापलेला सार्वजनिक विश्वस्त निधी आहे. प्रयासने आरोग्य, ऊर्जा, शिक्षण व पालकत्व, तसेच संसाधने व उपजीविका, या क्षेत्रात १९९४ सालापासून काम केले आहे. आपल्या व्यावसायिक ज्ञान व कौशल्यांचा वापर समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठीच्या प्रयत्नांना व संघर्षांना सहाय्यभूत ठरावे या उद्देशाने प्रयासचे काम चालू आहे. यामध्ये संशोधन, विश्लेषण, प्रशिक्षण, माहितीचा प्रसार, वाड्मय निर्मिती, धोरण वकिली इत्यादी विविध मार्गांचा उपयोग केला जातो. सध्या प्रयासमध्ये प्रामुख्याने ऊर्जा व आरोग्य या दोन क्षेत्रांमध्ये काम सुरू आहे.

प्रयास आरोग्य गट एचआयव्ही, लैंगिकता व प्रजनन आरोग्य, कॅन्सर प्रतिबंध आणि हवामान बदल आणि आरोग्य या विषयांवर काम करतो. एचआयव्हीसहित जगणाऱ्या व्यक्तींना सन्मानपूर्ण आणि निरोगी आयुष्य जगता यावं, त्यांना मिळणारी भेदभावाची वागणूक संपुष्टात यावी यासाठी आरोग्य गट सातत्याने कार्यरत राहिला आहे. जनजागृती, समुपदेशन, प्रशिक्षण, शैक्षणिक संसाधने, एचआयव्ही रुग्णांना स्वस्त दरात औषधोपचार, लिंगसांसर्गिक आजारांचे निदान आणि उपचार, आईकडून बाळाला होणारी एचआयव्हीची लागण रोखण्यासाठीचा खासगी वैद्याकीय क्षेत्रामधला कृती-कार्यक्रम, एचआयव्ही असणाऱ्या किशोरवयीन मुलामुलींच्या जीवन-क्षमतांचा विकास व्हावा यासाठी कार्यशाळा, ऑनलाइन गटामधून संवाद, एचआयव्हीसहित जगणाऱ्या व इतर स्त्रियांसाठी गर्भाशय मुखाच्या व स्तनाच्या कॅन्सरसाठी तपासणी, कॅन्सरपूर्व बदलांचे निदान व उपचार इत्यादी अनेक उपक्रम आरोग्य गट राबवतो. प्रयास आरोग्य गटाद्वारे चालवण्यात येणाऱ्या अमृता क्लिनिकमध्ये रुग्णांना यासंदर्भातील तपासणीची सेवा व औषधे पुरवली जातात. युवक, पालक, आणि प्रशिक्षकांसाठी लैंगिक आणि मानसिक आरोग्य संदर्भात डिजिटल शैक्षणिक संसाधने (विडिओ, ईझ्रलर्निंग प्लॅटफॉर्म), लैंगिकता शिक्षण असेही विशेष प्रयत्न केले जातात. या सर्व कामाला पूरक अशा संशोधनावरही भर दिला जातो. गेल्या तीन वर्षांपासून हवामान बदलामुळे आरोग्यावर काय परिणाम होतील यावरील संशोधन या विषयी प्रशिक्षण आणि जनसहभाग वाढवण्याचे प्रयत्न असेही काम आरोग्य गटाने हाती घेतले आहे.

आणखी वाचा-वर्धानपनदिन विशेष : पीआयसी, देशविकासाचा सोबती

प्रयास ऊर्जा गटाचे काम प्रामुख्याने ऊर्जा व विद्युत क्षेत्रातील धोरणे व ग्राहक हित या संदर्भात आहे. या क्षेत्रातील धोरण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी व विविध संस्थात्मक सुधारणा व जनकेंद्रित निर्णय प्रक्रिया व्हावी यासाठी प्रयास कार्यरत आहे. सुरुवातीच्या काळात एन्रॉनसारख्या प्रकल्पाचे महाराष्ट्रातील वीज क्षेत्रावर व ग्राहकांवर होणाऱ्या विपरित परिणामांचे विश्लेषण करणे व जनजागृती करणे, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या विजेचा खरा वापर, वीजचोरी आणि गळती, त्याचा ग्राहकांच्या वीज दरावर होणारा परिणाम यांसारख्या विषयांवर ऊर्जा गटाने काम केले. नंतरच्या काळात या विषयांच्या बरोबरीनेच वीजक्षेत्रातील सुधारणा व नियामक यंत्रणा तसेच वीज कायदा २००३ व त्या अंतर्गत आखली जाणारी विविध धोरणे या विषयात देखील संशोधन, विश्लेषण करून त्याद्वारे ग्राहकहिताच्या तसेच व्यापक सामाजिक व पर्यावरणीयदृष्ट्या योग्य धोरणांची आखणी करणे व अंमलबजावणी करणे यासाठी प्रयत्न केले. सुमारे २००० सालापासून महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये व केंद्रीयस्तरावर वीज क्षेत्राचे नियमन करण्यासाठी स्वतंत्र वीज नियामक आयोग स्थापन करण्यात आले. गेली वीस वर्षे महाराष्ट्रासह इतर काही राज्ये व केंद्रीय वीज नियामक आयोगापुढे ग्राहक प्रतिनिधी व सल्लागार समिती सदस्य म्हणून प्रयास तर्फे अनेक वेळेला ग्राहकांची बाजू यशस्वीपणे मांडण्यात येते. यामध्ये प्रामुख्याने वीज कंपन्यांचा कारभार सुधारणे, वीज खरेदीचे करार पारदर्शकपणे व स्पर्धात्मक पद्धतीने करून त्याद्वारे वीजदर आटोक्यात ठेवणे, ग्राहक सेवेचा दर्जा सुधारणे अशा विषयांवर लक्ष देण्यात येते. या बरोबरीनेच गेल्या काही वर्षांपासून प्रयास ऊर्जा गट वातावरण बदल व त्या संदर्भातील ऊर्जा क्षेत्राची धोरणे, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवणे, पंखे, फ्रीज, वातानुकूलन यंत्रे यांसारख्या उपकरणांची कार्यक्षमता वाढवणे, शेतीसाठी सौरऊर्जेचा वापर वाढवणे,कोळसा व कोळशावर आधारित वीज निर्मितीमध्ये सुधारणा करणे, गणिती प्रारूपांच्याद्वारे मध्यम व दीर्घ मुदतीच्या ऊर्जेसंबंधातील आव्हानांवर उपाययोजना सुचवणे अशा विविध विषयांवर संशोधन व विश्लेषण करून त्याद्वारे योग्य धोरण निर्मिती व अंमलबजावणीसाठी मदत करणे व या विषयात जनजागृती करणे अशा मार्गाने काम करत आहे. गेल्या ३० वर्षांत प्रयास तर्फे हाती घेतलेले अनेक उपक्रम, विविध प्रकाशने, संशोधनात्मक लेख, जनजागृतीसाठी तयार केलेले व्हिडिओ, माहितीपर पुस्तिका इत्यादी सर्व माहिती www. prayaspune. org या आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.