पुणे : प्रत्ययकारी सादरीकरण आणि भक्तिरचनांचे गायन अशा सहजसुंदर अभिवाचनातून आळंदीवारी एकादशीच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील भाविकांचा लोकसखा ‘श्रीविठ्ठला’चे सोमवारी दर्शन घडले. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक डाॅ. रा. चिं. ढेरेलिखित ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ ग्रंथावर आधारित ‘विठो पालवीत आहे’ या कार्यक्रमातून सारे भक्तिरंगात रंगले.

डाॅ. रा. चिं. ढेरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमात चंद्रकांत काळे, गजानन परांजपे आणि स्वामिनी पंडित यांनी अभिवाचन, तर काळे आणि अंजली मराठे यांनी गायनातून श्रोत्यांना खिळवून ठेवले. त्यांना दीप्ती कुलकर्णी, अपूर्व द्रविड आणि अक्षय शेवडे यांनी साथसंगत केली. त्यापूर्वी डाॅ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानमालेतील व्याख्यानांचे संकलन असलेल्या ‘बहुरूपी रामकथा’ या पद्मगंधा प्रकाशनाच्या पुस्तकाचे प्रकाशन मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर, पद्मगंधा प्रकाशनाच्या ‘भारतीय रंगभूमीच्या शोधात’ आणि सुरेश एजन्सीच्या वतीने ‘बोरकरांची प्रेमकविता’ या डाॅ. रा. चिं. ढेरेलिखित पुस्तकांचे प्रकाशन याच कार्यक्रमात करण्यात आले. बोरकर यांची नात लीना भट, डाॅ. अरुणा ढेरे, वर्षा गजेंद्रगडकर, प्रकाशक अभिषेक जाखडे, संतोष शेणई, सुरेश एजन्सीचे शैलेंद्र कारले या वेळी उपस्थित होते.

श्रीविठ्ठल’चा इंग्रजी अनुवाद नव्याने वाचकांच्या भेटीला

डाॅ. रा. चिं. ढेरेलिखित ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या ग्रंथाच्या ॲन फेल्डहाऊस यांनी अनुवादित केलेल्या ‘द राइज ऑफ फोक गॉड’ हा इंग्रजी अनुवादित ग्रंथ १५ वर्षांनी वाचकांच्या भेटीला आला आहे. हा मूळ ग्रंथ ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केला होता. मात्र, हा अनुवादित ग्रंथ गेल्या १५ वर्षांपासून उपलब्ध नाही. हे लक्षात घेऊन आम्ही प्रकाशक, तसेच ग्रंथाच्या अनुवादकांशी संवाद साधला आणि प्रकाशनाची परवानगी मिळाली, असे पद्मगंधा प्रकाशनाचे अभिषेक जाखडे यांनी सांगितले.

डाॅ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्राच्या माध्यमातून अण्णांनी निर्माण केलेल्या अभ्यासवाटा नव्या पिढीच्या अभ्यासकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांचा ग्रंथसंग्रह ग्रंथालयाच्या स्वरूपात खुला केला आहे. विविध विषयांवरील व्याख्यानमालांच्या माध्यमातून डॉ. ढेरे यांची आंतरविद्याशाखीय दृष्टी पुढे नेण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा अभ्यास करताना ढेरे यांच्या नावाशिवाय पुढे जाता येत नाही, एवढे काम त्यांनी करून ठेवले आहे. डाॅ. अरुणा ढेरे, अध्यक्ष, डाॅ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्र